ईडीला दोन दिवस आधी पुरावे सादर करावे लागणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविऊद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या आरोपपत्रावर राऊस एव्हेन्यू न्यायालयाने 10 मे रोजी सुनावणी घेण्याचे ठरवले आहे. पुढील सुनावणीची तारीख निश्चित करतानाच या प्रकरणाशी संबंधित सीडी, डीव्हीडी, पेन ड्राईव्ह आदी पुरावे 8 मे पर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश ईडीला देण्यात आले आहेत.
दिल्लीतील बहुचर्चित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीचे हे चौथे पुरवणी आरोपपत्र आहे. या आरोपपत्रात ईडीने मनीष सिसोदिया यांच्यावर गंभीर आरोप केल्याचे समजते. सिसोदिया यांच्याविरोधातील हे पुरवणी आरोपपत्र 2,100 पानांचे आहे. मद्य धोरण घोटाळा प्रकरणात सिसोदिया यांच्याकडून 622 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा ईडीने केला आहे.
दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रथमच ईडीने सिसोदिया यांना आरोपी म्हणून आरोपपत्र दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने सिसोदिया यांना 9 मार्च रोजी तिहार तुऊंगातून अटक केली होती. सिसोदियांना सर्वप्रथम 26 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. ते सध्या न्यायालयीन कोठडीत असून सीबीआयने सिसोदिया यांना ‘मुख्य सूत्रधार’ ठरवले आहे. तपास यंत्रणांनी याप्रकरणी आतापर्यंत सिसोदिया आणि अन्य 11 जणांना अटक केली आहे.









