तुरुंगातच राहणार दिल्लीचे मुख्यमंत्री
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अटकेच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी टळली आहे. आता याप्रकरणी 5 सप्टेंबर रोजी पु ढील सुनावणी होणार आहे. केजरीवालांनी अटकेच्या विरोधात 2 याचिका दाखल केल्या होत्या. यातील एका याचिकेवर सीबीआयने स्वत:ची भूमिका मांडली आहे. तर दुसऱ्या याचिकेवर भूमिका मांडण्यासाठी मुदत मागितली, याचमुळे सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास सुनावणी टाळली आहे. म्हणजेच अरविंद केजरीवालांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी 5 सप्टेंबरपर्यंत टाळून सीबीआयला एक आठवड्याच्या आत बाजू मांडण्यास सांगितले आहे. 14 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने केजरीवालांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिला होता. पीएमएलए 2022 अंतर्गत ईडीकडून नोंद गुन्ह्याप्रकरणी आप नेत्याला कठोर तरतुदी असूनही अंतरिम जामीन दिला होता असा युक्तिवाद केजरीवालांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला होता.
केजरीवाल आएंगे अभियान
एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी तूर्तास टाळली आहे, तर दुसरीकडे आम आदमी पक्षाने 2025 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘केजरीवाल आएंगे’ अभियान सुरू केले आहे. आप राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी दिल्लीवासीय स्वत:च्या मुख्यमंत्र्यांची आतुरतेने प्रतीक्षा करत असल्याचा दावा केला. केजरीवालांना अटक झाल्याने दिल्लीतील अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. केजरीवालांच्या मुक्ततेनंतर सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि प्रलंबित समस्यांवर तोडगा निघेल असा लोकांना पूर्ण विश्वास असल्याचे पाठक यांनी म्हटले आहे.
सीबीआयला बाजू मांडावी लागणार
केजरीवालांनी अबकारी धोरण घोटाळ्याशी निगडित भ्रष्टाचाराप्रकरणी झालेल्या अटकेच्या कारवाईला न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर बाजू मांडण्यासाठी एक आठवड्याची अतिरिक्त मुदत सीबीआयला दिली आहे.









