22 ऑगस्टला शक्यता, मात्र निश्चिती नाहीच
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगावर सुनावणी नेमकी केव्हा होणार, याचे उत्तर लवकर मिळण्याची शक्यता कमी आहे. शिवसेनेच्या अंतर्गत कलहावरील ही सुनावणी 12 ऑगस्टला होईल असे घोषित करण्यात आले होते. तथापि, आता हा मुहूर्तही चुकणार असून सुनावणी 22 ऑगस्टला होण्याची शक्यता आहे.
22 ऑगस्टला तरी सुनावणी होईल की नाही, याविषयीही साशंकता आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. सध्या ती सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठासमोर होत आहे. सरन्यायाधीश रमणा हे 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत. त्यामुळे 22 ऑगस्टनंतर त्यांच्याकडे केवळ चार दिवस राहणार असून तेव्हढय़ा कमी कालावधीत ते हे प्रकरण पुढे विचारार्थ घेतील का हाही प्रश्नच आहे, अशीही चर्चा आहे. कदाचित हे प्रकरण मोठय़ा घटनापीठाकडे किंवा नव्या खंडपीठाकडे सोपविले जाण्याची शक्यता आहे.
नव्या सरन्यायाधीशांकडे ?
हे प्रकरण आता नव्या सरन्यायाधीशांकडे येईल अशीही शक्यता आहे. न्या. उदय उमेश लळीत हे 27 ऑगस्टला सरन्यायाधीशपदाचा भार सांभाळतील. ते या पदावर 74 दिवस कार्यरत राहतील. त्यानंतर सरन्यायाधीशपदी अनुक्रमानुसार न्या. धनंजय चंद्रचूड येणार आहेत. न्या. लळीत यांच्या कार्यकालात ही सुनावणी पूर्ण होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे सरन्यायाधीश रमणा 22 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट या पाच दिवसांच्या काळात कोणता निर्णय घेतात याकडे साऱयांचे लक्ष लागलेले असून यासंदर्भात सर्व संबंधितांची उत्सुकता ताणली गेली आहे.









