चिपळूण :
तालुक्यातील धामणवणे-खोतवाडी येथे निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या खूनाचा तपास करताना काही महत्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. विशेष म्हणजे मारेकऱ्याने घरातील सीसीटिव्हीचा डिव्हीआर पळवून नेल्याचे पुढे आले असतानाच आता घरातील संगणकातील ‘हार्डडिक्स’ही पळवून नेल्याचे पुढे येत असल्याने मारेकरी हा माहितगार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी चहूबाजूने तपासाला दिशा दिली आहे. शिवाय या प्रकरणात एकापेक्षा अधिक संशयितांचा सहभाग असल्याची शक्यता असल्याने पोलिसांची पाच पथके मारेकऱ्यांच्या मागावर आहेत.
शहरापासून जवळच असलेल्या धामणवणे खोतवाडी येथील 63 वर्षीय निवृत्त प्राथमिक शाळेच्या शिक्षिका वर्षा वासुदेव जोशी यांचा खून झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. असे असले तरी कामथे रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार घटना उघडकीस येण्यापूर्वी सुमारे 10 ते 12 तास अगोदर त्या मृत झालेल्या असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच बुधवारी रात्री 12 ते 1 नंतर वर्षा जोशी यांचा खून करण्यात आला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अंगावरील काही कपडे काढलेले असले तरी अतिप्रसंग झाला नसल्याचे तसेच अंगावरील किरकोळ ओरबाडे हे प्रतिकाराच्या झटापटीतून झाले असून नाक-तोंड दाबल्यानेच गुदमरुन त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालातून स्पष्ट झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, या खून प्रकरणात मारेकऱ्याने पूर्ण ‘प्लॅन’ तयार करुन मग खून आणि पुढे पुरावे नष्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुरावे नष्ट करताना मोबाईत पाण्याच्या बादलीत आढळला, तर सीसीटीव्हीचा डिव्हीआर गायब करण्यात आला आहे. आता जोशी यांच्या घरातील संगणकाची हार्डडिस्कही गायब असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या खूनातील मारेकरी हा माहितगार व ते एकापेक्षा जास्त असावेत, या निर्ष्कषापर्यंत पोलीस आले आहेत. दरम्यान, गुरुवारी ज्या व्यक्तीला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्याची चौकशी पूर्ण करुन त्याला सोडून देण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांनी आपला तपास आता अन्य मार्गाने सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्या माध्यमातूनही काही संशयित हालचाली हाती लागल्याचे पुढे येत आहे.
मृत जोशी या घरी एकट्याच राहत होत्या. चोरी झाली असेल तर नेमके काय गेलेय, तेही सांगणारे कुणी नाही. त्यामुळे खून नेमका कशासाठी झाला, याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मात्र मिळालेल्या काही धाग्यादोऱ्यानुसार पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून लवकरच मारेकऱ्यांपर्यत पोहचू, असा विश्वास पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत.
- मारेकऱ्याच्या शोधासाठी 5 पथके कार्यरत
या प्रकरणानंतर अप्पर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी गेले दोन दिवस चिपळूणमध्ये ठाण मांडून आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा-रत्नागिरी पथक यांच्यासह 5 पथक कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यातील एक पथक स्थानिक पातळीवर, तर इतर चार अन्य ठिकाणी पाठवण्यात आली आहेत.
- वर्षा जोशी यांच्यावर चिपळुणात अंत्यसंस्कार
वर्षा जोशी यांचा मृतदेह कामथे रुग्णालयात विच्छेदनासाठी नेण्यात आला होता. विच्छेदनानंतर मृतदेह त्यांच्या भावाच्या ताब्यात देण्यात आला. गुऊवारी रात्री उशिरा चिपळुणात अंत्यसंस्कार करण्यात आले.








