बेतकी येथे झाड कोसळून मायलेक ठार घटना : शोकाकुल वातावरणात माय-लेकावर अंत्यसंस्कार,मंत्री गोविंद गावडे यांनी व्यक्त केले दु:ख
माशेल : अनकल्लेवाडा-बेतकी, खांडोळा येथे घराच्या बाजूला असलेल्या सिमेंट पत्र्याच्या शेडवर किंदळाचे झाड कोसळून आई व मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने रविवारचा दिवस वाडकर कुटूंबियांसाठी घातवार ठरला. डोळ्यादेखत हसतखेळत असलेल्या आपल्या कुटूंबियाचा संसार एका क्षणात पुर्णपणे उध्वस्त झाल्याचा टाहो अमित वाडकर फोडत आहे. काल सोमवारी दुपारी 3 वा सुमारास मयत मायलेकाच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार रविवारी सायंकाळी साडेसात वा. सुमारास घडलेल्या घटनेत अंजली अमित वाडकर (36) मुलगा भावेश अमित वाडकर (10) या आई व मुलाचा मृत्यू झाला होता. रस्त्याला लागूनच झाडीझुडूपात अमित वाडकर यांचे एकच घर पुढील भागात असून पाठीमागच्या भागात आंघोळीसाठी पाणी गरम करणे व वाहने पार्क करण्यासाठी शेड उभारण्यात आलेली आहे. सायंकाळच्या वेळी पाणी गरम करण्यासाठी अंजली ही चूलीजवळ बसली होती. तसेच यावेळी त्याच्याजवळ आतमध्ये भावेशही होता. वाऱ्याच्या प्रवाहात अचानक रस्त्यालागून असलेले किंदळाचे झाड सरळ शेडवर कोसळले. काही समजण्याच्या आत छप्परावरील पत्रे व बांधकामाला जोडलेले चिऱ्याचे खांब तुटून दोघेही माय-लेक त्याखाली सापडलेले. वाडकर यांचे येथे एकुलतेच घर असल्याने आरडाओरडा केल्यानंतर मदतीसाठी कोणी पोचले नाही. त्याचस्थितीत अमितने आटोकाट प्रयत्न करीत त्याना बाहेर काढले. बेतकी येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. यावेळी भावेश याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर अंजली हिला बांबोळी येथे उपचारासाठी हलविताना तिचा वाटेत मृत्यू झाला.
वाडकर कुटूंबावर काळाचा घाला, क्षणात संसार उध्वस्त
मृत अंजली व भावेश यांच्या पश्चात वडील व एक लहान बहीण आहे. अमित हा सहकार खात्यात वरिष्ट ऑडीटर म्हणून काम करीत आहे. तर अंजली ही गृहीणी होती. भावेश हा मागील तीन वर्षापासून आपल्या मामाच्या घरी गावणे येथील प्राथमिक शाळेत शिकत होता. यंदा चौथीच्या वर्गात त्याला बेतकी येथील शाळेत त्याचा दाखला करण्यात आला होता. केवळ पाच दिवस शाळेत जायला मिळाले. घराकडून शाळेत जायला मिळत असल्यामुळे तो उत्साहात होता. मात्र दुर्देवाने रविवार हाच वाडकर कुटूंबियांसाठी ठरला घातवार. याप्रकरणी म्हार्दोळ पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे यांनी घटनास्थळावर भेट दिली. म्हार्दोळ पोलीस पुढील तपास करीत आहे.
घरांना धोकादायक ठरणाऱ्या झाडांची माहिती द्यावी
घटनेची वार्ता कळताच स्थानिक आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांनी रविवारी घटनास्थळी धाव घेतली. बेतकी येथील आरोग्य केंद्रातही भेट घेतली. अमित वाडकर यांचे सात्वन केले. यावेळी बोलताना ते म्हणजे अंत्य दुर्दैवी घटना असल्याचे म्हटले आहे. घरांना कायम धोकादायक ठरणाऱ्या झाडांची सर्वेक्षण उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत व्हावे. भाटकारांनी याकामी सहकार्य करावे असे आवाहन केले. आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत धोकादायक झाडांच्या फाद्या छाटण्याकडे लक्ष देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.









