महापौरांनी बजेटवेळी केली होती घरपट्टी वाढणार नसल्याची घोषणा : मात्र घरपट्टी वाढविण्याचा नगरविकास खात्याचा प्रस्ताव
बेळगाव : महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. दररोज वाढणाऱ्या गॅस सिलिंडर आणि खाद्यपदार्थांच्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशातच आता घरपट्टी वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश नगरविकास खात्याने महापालिका प्रशासनाला बजावला आहे. घरपट्टी वाढणार नसल्याची घोषणा बजेटवेळी महापौरांनी केली असली तरी सरकारच्या आदेशानुसार घरपट्टीवाढीची तलवार टांगती आहे. महापालिकेचा अर्थसंकल्प तयार करण्याच्यादृष्टीने सभागृहात सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. सध्या महागाईमुळे सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. अशातच विविध कराचा बोजा वाढत असून दररोज गॅस सिलिंडर व खाद्यपदार्थांचे दरदेखील वाढत आहेत. त्यामुळे महापालिकेने घरपट्टी वाढवू नये, याबाबतची सूचना नगरसेवकांनी महापालिका सभागृहात केल्या होत्या. त्यानुसार तशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महापौर शोभा सोमनाचे यांनी घरपट्टी वाढणार नसल्याची घोषणा अर्थसंकल्प बैठकीवेळी केली होती. त्याबद्दल महापौरांचे अभिनंदनदेखील करण्यात आले होते. मात्र अर्थसंकल्प बैठक झालेल्या काही दिवसांतच नगरविकास खात्याने महापालिका प्रशासनाला पत्र पाठवून घरपट्टी वाढ करण्याचा आदेश बजावला आहे. तसेच आठ दिवसांत हा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठविण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली आहे. त्यामुळे घरपट्टीवाढ अनिवार्य असल्याचे स्पष्ट झाले आहे.
यापूर्वी तीन वर्षांने एकदा 15 ते 30 टक्के घरपट्टीत वाढ करण्याची तरतूद महापालिका कायद्यात होती. त्यामुळे दर तीन वर्षांनी घरपट्टीत 15 टक्के वाढ करण्यात येत होती. मात्र मागील वर्षीपासून शासनाने नवे बदल केले आहेत. उपनोंदणी खात्याच्या दरानुसार मालमत्तेची किंमत करून त्यावर घरपट्टी आकारण्याची सूचना केली आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी ठरणाऱ्या उपनोंदणीच्या दरानुसारच घरपट्टी निश्चित करण्याची सूचना केली आहे. प्रत्येक वर्षी तीन ते पाच टक्क्यांपर्यंत घरपट्टीत वाढ करण्याची तरतूद कायद्यात केली आहे. त्यामुळे मागील वर्षीपासून नव्या मार्गसूचीनुसार घरपट्टी वाढ करण्यात येत आहे. यंदादेखील या मार्गसूचीनुसार घरपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना महापालिका प्रशासनाला केली आहे. 31 मार्चअखेरपर्यंत घरपट्टीवाढीचा प्रस्ताव सादर करण्याचा आदेश बजावला आहे. दि. 1 एप्रिलपासून वाढीव घरपट्टीची आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत घरपट्टीवाढीचा प्रस्ताव नगरविकास खात्याकडे महापालिका प्रशासनाला सादर करावा लागणार आहे. त्यामुळे घरपट्टी वाढीचा प्रस्ताव तयार करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. पण सध्या चेकपोस्टवर काम करण्याची जबाबदारी मनपा कर्मचाऱ्यांवर सोपविली असल्याने घरपट्टीवाढीचा प्रस्ताव कसा तयार करायचा? असा प्रश्न मनपा महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. घरपट्टी वाढणार नसल्याची घोषणा महापौरांनी केली असली तरी घरपट्टी वाढणार हे निश्चित आहे.









