250 हून अधिक माजी अधिकाऱ्यांकडून संशय व्यक्त : पंतप्रधानांशी पत्रव्यवहार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताबाबत अजूनही अनेक शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. माजी रॉ प्रमुख, एनआयएचे माजी संचालक, आयबीचे निवृत्त अधिकारी आणि काही राज्यांचे निवृत्त डीजीपी यांच्यासह देशातील 270 माजी न्यायाधीश, निवृत्त आयएएस-आयपीएस आणि लष्करी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या अपघातामागे मोठे दहशतवादी कारस्थान असल्याची भीती व्यक्त केली आहे. तसेच देशभरात पसरलेल्या रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेसाठी रेल्वेमार्गाशेजारी स्थायिक झालेले अवैध घुसखोर आणि अवैध अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे.
देशातील 14 माजी न्यायाधीश, 115 निवृत्त नोकरशहा आणि 141 माजी लष्करी अधिकाऱ्यांसह एकूण 270 प्रतिष्ठित व्यक्तींनी ओडिशातील रेल्वे अपघाताबाबत अनेक मुद्दे उपस्थित केल आहेत. बालासोर दुर्घटनेचा तपास अद्याप सुरू आहे. परंतु एकंदर स्थिती पाहता हे दहशतवादी संघटनांनी घडवून आणलेले कृत्य असू शकते, असा संशय माजी अधिकाऱ्यांना वाटत आहे. सीबीआयच्या तपासाचा निर्णय योग्य ठरवत सीबीआय खऱ्या गुन्हेगारांचा पर्दाफाश करेल, अशी आशा निर्माण झाली आहे. अशा घटनांचा संपूर्ण देशाच्या रेल्वे नेटवर्कला धोका असून भारतातील रेल्वेमार्ग असुरक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रश्नी पंतप्रधानांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करत रेल्वेमार्गांवरील अवैध अतिक्रमण हटवून सुरक्षेसाठी कठोर पावले उचलणे अत्यावश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.









