सुनील फडतरे-अमित कुमार यांच्यातील कुस्ती बरोबरीत
वार्ताहर /नंदगड
हलशी येथील श्री भुवराह लक्ष्मी नरसिंह देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी सुनील फडतरे विऊद्ध दिल्ली नॅशनल चॅम्पियन अमित कुमार यांच्यात 7.20 वाजता लावण्यात आली. हलशी कुस्ती कमिटीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, सचिव प्रल्हाद कदम, लैला शुगर्सचे एम. डी. सदानंद पाटील, प्रशांत लक्केबैलकर व कुस्ती कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते लावण्यात आली. पंच म्हणून माऊती देसाई यांनी काम पाहिले. ही कुस्ती अतिशय प्रेक्षणीय झाली. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना सुऊवातीला प्रोत्साहन दिले. विसाव्या मिनिटाला सुनील फडतरे यांनी एक चाक डावावर डाव मारला. पण तो डाव अर्धवट झाल्याने पंच व प्रेक्षकांना मान्य झाला नाही. पंचांनीच निर्णय दिला असल्याचे समजून सुनील फडतरे मैदानाच्या बाहेर गेला. बराचवेळ मैदानामध्ये गोंधळ निर्माण झाला. याबाबत चर्चा झाली. पंचांनी तीन कॉल केल्यानंतर काही वेळानंतर सुनिल फडतरे मैदानामध्ये आला. त्यानंतर पंचांनी अंतिम निर्णय म्हणून ही कुस्ती बरोबरीत सोडवण्याचा निर्णय घेतला.
आखाड्यातील नंबर दोनची कुस्ती कामेश कंग्राळी विऊद्ध प्रकाश इंगळगी यांच्यात झाली. ही कुस्ती म. ए. समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, शिवसेनेचे राज्य उपाध्यक्ष के. पी. पाटील, हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष महाबळेश्वर पाटील, खानापूर तालुका कुस्ती संघटनेचे लक्ष्मण बामणे, पांडुरंग पाटील आदांसह अन्य मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. पंच म्हणून नविन पाटील यांनी काम पहिले. या कुस्तीत सुऊवातीला प्रकाश इंगळगी यांनी प्रतिस्पर्धी कामेश याच्यावर ताबा मिळविला. दहाव्या मिनिटाला प्रकाशने नागपट्टी लावली. तो हल्ला कामेशने परतावून लावला. कुस्ती आखाड्याच्या बाहेर गेली. पंचांनी पुन्हा कुस्ती आखाड्यात आणून लावली. दोन्ही पैलवान एकाच ताकदीचे राहिल्याने तब्बल 18 मिनिटे कुस्ती चालली. शेवटी पंचांनी दोन्ही पैलवानांना दोन मिनिटे वेळ दिला. व कुस्ती पुन्हा करण्याची पैलवानांना सूचना दिली. दरम्यान कामेशच्या पायाला जखम झाल्याने शेवटी पंचांनी प्रकाश इंगळगी याला विजयी घोषित केले.
तीन नंबरची पै. रोहन घेवडे विऊद्ध संतोष हारूगिरी यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. तर चार नंबरच्या कुस्तीत पैलवान प्रेम कंग्राळी यांनी प्रतिस्पर्धी सुनील करवते यांच्यावर विजय मिळवला. पाच नंबरच्या कुस्तीत पार्थ कंग्राळी याने एक चाक डावावर प्रतिस्पर्धी दयानंद शिरगाव यांच्यावर विजय मिळविला. तर या कुस्ती आखाड्यात पृथ्वीराज पाटील कंग्राळी, राहुल माचीगड, रोहित माचीगड यांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला. तर हणमंत गंदीगवाड विऊद्ध महेश तीर्थकुंडे व पैलवान प्रवीण निलजी विऊद्ध महादेव दर्यानावर या दोन्ही कुस्त्या बरोबरीत सोडविण्यात आल्या. या आखाड्यात अन्य आकर्षक कुस्त्या झाल्या. आखाड्यात कुस्त्या सुरू असतानाच आकाशात ढग दाटून आले होते. पाऊस पडणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रेक्षकही कुस्त्या पाहण्यासाठी थांबून होते. शेवटी पाऊस थांबला. त्यामुळे सर्व कुस्त्या व्यवस्थित झाल्या. कुस्त्याचे समालोचन महेश मिनकडे इचलकरंजी व सुहास पाटील यांनी केले. पंच म्हणून शिवाजी भातकांडे, डी. एम. भोसले, ऊद्राप्पा हेंडोरी, मधु पाटील, जयवंत खानापूरकर, राजाराम गुरव यांनी काम पाहिले.









