हिंदू जनजागृती समितीची मागणी
फोंडा : जुने गोवे येथील ‘हात कातरो’ खांबाचे जतन व्हावे, तसेच भावी पिढीला धर्माभिमानी लोकांच्या बलिदानाचा इतिहास कळावा, यासाठी गोवा सरकारने हात कातरो खांबाला ‘स्मृतीस्तंभ’ म्हणून घोषित करावे अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक यांनी केली. जुलमी पोर्तुगिजांनी गोमंतकातील हिंदुंवर केलेल्या अनन्वीत अत्याचाराची साक्ष देणारा हात कातरो खांब जुने गोवे येथे उभा आहे. क्रांतीदिनाचे औचित्य साधून हिंदू जनजागृती समितीच्या प्रतिनिधींनी हात कातरो खांबाला पुष्पहार अर्पण केला. यावेळी केरलीय क्षेत्र परिपालन समिती, बदलापूर महाराष्ट्र आश्रमाचे स्वामी पी. पी. एम. नायर, शिव छत्रपती संघटनेचे सज्जन जुवेकर, आनंद मांद्रेकर, गोमंतक मंदिर महासंघाचे जयेश थळी, दिवाडी गोपाळकृष्ण मंदिरचे अध्यक्ष सत्यवान म्हामल, सचिव अशोक नाईक, दिवाडी येथील विद्या भारती संचालित सेंट एलॉयसिएस विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. हात कातरो खांबाची माहिती इतिहासाच्या पाठ्यापुस्तकात समाविष्ट करावी, तसेच खांबाच्या ठिकाणी ऐतिहासिक महत्त्व सांगणारा माहिती फलक उभारण्यात यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.









