
सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
पणजी येथील कलारंग प्रतिष्ठान आयोजित गुणीरंग संगीत समारोहात नामवंत कलाकारांच्या गायन वादनाच्या मैफली रंगल्या. कला व संस्कृती खाते आणि इन्स्टिटय़ूट ब्रागांझा यांच्या सहकार्याने मिनेझिस ब्रागांझा सभागृहात हा संगीत समारोह पार पडला.
सकाळच्या पहिल्या सत्रात गोव्यातील प्रथितयश गायक महेश साखळकर यांनी राग अहिर भैरव सादर केला. राग अहिरी आणि राग भैरव यांच्या सुसंगत मिलाफातून निर्माण झालेल्या या रागाची यथोचित बढत आणि सामंजस्यपूर्ण आळवणी यामुळे महेशने रसिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. त्यांना संवादिनीवर प्रसाद गांवस तर तबल्यावर नितीन कोरगावकर यांनी साथसंगत केली.
दुसऱया सत्रात गोमंतकीय तबलावादक अमित भोसले यांनी तबला एकलवादन सादर केले. ताल तीनताल त्यांनी विस्ताराने पेश केला. अवनद्ध वाद्यांतल्या तबल्यावर कायदे, पेशकार, चक्रधार व अन्य उपांगे त्यांनी तयारीने पेश केली. रेले, परण, बंदिशी, लयकारी, मुखडे ही तबल्याची परिभाषा त्यांनी खुमासदारपणे रसिकांपर्यंत पोहचविली. विविध घराण्याच्या वादन पद्धतींचाही परामर्श त्यांनी एकलवादनातून घेतला. त्यांना दत्तराज म्हाळशी यांनी नगमा साथ दिली.
सकाळच्या तिसऱया सत्रात गोव्यातील नामवंत कलाकार प्रा. रुपेश गांवस यांनी राग जौनपुरी सादर केला. विलंबित एकतालात आळविलेली बंदिश प्रबळ कंठ संस्कारांमुळे रसिकांच्या पसंतीस उतरली. उपजयुक्त बढत, श्रवणीय स्वरलगाव, मनोहारी विस्तार यामुळे त्यांचे गाणे रंगले. शेवटी ठुमरी गाऊन त्यांनी आपले गाणे आटोपते घेतले. त्यांना तबल्यावर अमर मोपकर तर संवादिनीवर दत्तराज म्हाळशी यांनी साथसंगत केली.
दुपारच्या पहिल्या सत्रात अमला कारापूरकर यांचे गाणे झाले. त्यांनी राग भिमपलास आपल्या मैफलीसाठी निवडला. समर्पक आलापी, शिस्तबद्ध ताना, सुबद्ध सरगम यामुळे त्यांची मैफल व्यवस्थित जमली. त्यांना संवादिनीवर प्रसाद गांवस तर तबल्यावर नितीन कोरगावकर यांनी साथ दिली.
दुसऱया सत्रात श्रुती मणेरीकर बोरकर यांचे नाटय़गीत गायन झाले. निवडक नाटकातील प्रचलीत गाणी अत्यंत प्रभावीपणे सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. कंठमाधुर्य, नाटय़पदांसाठी आवश्यक आवेश, अभिव्यक्ती यामुळे त्यांचे गाणे रंगले. नाटय़गीतामागील पार्श्वभूमीचा आढावा घेत त्यांनी गायिलेली रसपरिपोषक नाटय़पदे रसिकमनाला भावली. त्यांना संवादिनीवर दत्तराज म्हाळशी तर तबल्यावर मिलिंद परब यांनी साथ केली. त्यानंतर मुंबईतील प्रख्यात गायक पं. गिरीश संझगिरी यांचे गायन झाले. सायंकालीन पुरिया धनश्री त्यांनी गायला. संयमित तेवढीच रागोपयुक्त मांडणी. लयीची प्रमाणबद्धता आणि श्रृतीयुक्त बढत यामुळे त्यांचे गाणे रंगतदार झाले. आकर्षक, मधूर आणि कर्णप्रिय स्वरसमुहांचा परिणामकारक वापर यामुळे त्यांचे गाणे विशिष्ट उंची गाठणारे ठरले. त्यांना प्रसाद गांवस यांनी संवादिनीवर तर अमर मोपकर यांनी तबल्यावर साथ दिली.
शेवटच्या सत्रात आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. कमलाकर नाईक यांनी राग हेमकल्याण सादर केला. रागाची सुरेख तेवढीच प्रभावी मांडणी, लालित्यपूर्ण बढत, परिपक्व आळवणी आणि नजाकतदार विस्तार यामुळे त्यांचे गाणे श्रवणीय झाले. रागातील क्लिष्टता सुलभपणे आणि बारकाव्यासह पेश करीत त्यांनी रंजक आणि विद्वत्ताप्रचूर गायकीचा आगळा नमूना पेश केला. विशिष्ट लयीच्या अंगाने स्वरांकीत होणारे बंदिशीचे बोल हृदयस्पर्शी तेवढेच रसोत्कट असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी रसिकवर्गामधून उमटल्या. त्यांना संवादिनीवर दत्तराज म्हाळशी तर तबल्यावर डॉ. उदय कुलकर्णी यांनी उत्तम साथसंगत केली. तर पंकज नाईक व अमेय वाडीकर यांनी स्वरसाथ दिली. दुर्गाकुमार नावती यांनी सूत्रसंचालन केले.









