आयएमएफचे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढत्या सामर्थ्यावर शिक्कामोर्तब
वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (आयएमएफ) आशिया-प्रशांत क्षेत्राच्या विकासदराचा अनुमान 3.8 टक्क्यांवरून वाढवत 4.6 टक्के करण्यात आला आहे. जगातील सर्वात मोठय़ा वित्तीय संस्थेकडून पाश्चिमात्य देशांच्या मोठय़ा अर्थव्यवस्थांवर मंदीचे संकट घोंगावत असताना विकासदराचा अनुमान वाढविण्यात आला आहे.
आशिया-प्रशांत क्षेत्राचा विकासदर चालू आर्थिक वर्षात 4.6 टक्के राहू शकतो. 2022 मध्ये हा विकासदर 3.8 टक्के इतका होता. ऑक्टोबर 2022 मध्ये व्यक्त वर्ल्ड इकोनॉमिक आउटलुक अहवालात व्यक्त करण्यात आलेल्या अनुमानापेक्षा हे प्रमाण 0.30 टक्क्यांनी अधिक आहे. या वृद्धीत सर्वाधिक योगदान भारत आणि चीनच्या अर्थव्यवस्थेचे असणार आहे.
भारत आणि चीन हे आशिया-प्रशांत क्षेत्रातील दोन मोठय़ा अर्थव्यवस्थांमध्ये सामील आहेत. सद्यकाळात पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत भारत आणि चीनची अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत होणाऱया वृद्धीत आशिया-प्रशांत क्षेत्राचे योगदान 70 टक्के राहणार असल्याचे आयएमएफने म्हटले आहे.
चीनच्या स्थितीतील सुधारणा आणि भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने वाढत असल्याने आशियाच्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा वेग अधिक राहणार आहे. तसेच आशियाच्या उर्वरित हिस्स्यांमधील विकासाचादर 2023 च्या नीचांकी स्तरावर राहण्याची शक्यता असल्याचे आयएमएफकडून नमूद करण्यात आले आहे.
चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.3 टक्के विकासदर गाठू शकते असे जागतिक बँकेचे म्हणणे आहे. तर रिझर्व्ह बँकेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 6.5 टक्के विकासदराचा अनुमान व्यक्त केला आहे.









