नवी दिल्ली / वृत्तसंस्था
2022-2023 या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱया तिमाहीत देशाचा आर्थिक विकासदर काहीसा मंदावलेला दिसत असून तो 4.4 टक्के इतका नोंद झाला आहे. ही आकडेवारी मंगळवारी घोषित करण्यात आली. त्याच्या मागच्या वर्षी याच कालावधींत विकासदर 5.4 टक्के होता.
या आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या तिमाहीत आर्थिक विकासाचा दर 13.5 टक्के इतका होता. त्यानंतर जुलै ते सप्टेंबर या दुसऱया तिमाहीत तो 6.3 टक्के इतका झाला होता. आता तिसऱया तिमाहीत तो त्याहीपेक्षा खाली घसरला असून 4.4 टक्के झाला आहे. जागतिक मंदी आणि काही देशांतर्गत घटक या घसरणीला कारणीभूत आहेत, अशी माहितीही केंद्र सरकारच्या अर्थविभागाने दिली आहे.
उत्पादन क्षेत्र कारणीभूत
तिसऱया तिमाहीत उत्पादन क्षेत्राच्या असमाधानकारक कामगिरीमुळे विकास दरात घसरण झाली आहे. 2022-2023 या आर्थिक वर्षाचा एकंदर विकास दर 7 टक्के राहील असे अनुमान व्यक्त करण्यात आले. 2021-2022 या आर्थिक वर्षात विकास दर 9.1 टक्के होता. सध्याच्या आर्थिक वर्षाच्या तिसऱया तिमाहीत उत्पादन क्षेत्राच्या विकासदरात 1.1 टक्का घट झाल्याचे दिसून आले आहे.
इतर क्षेत्रांचा विकास समाधानकारक
2022-2023 या आर्थिक वर्षाच्या तिसऱया तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांचा विकास त्या तुलनेत समाधानकारक झाला आहे. कृषी क्षेत्र विकासदर 3.7 टक्के, बांधकाम क्षेत्र विकासदर 8.5 टक्के आणि खाण क्षेत्र विकासदर 3.7 टक्के असा अन्य क्षेत्रांचा विकास दर असून तो त्याच्या मागच्या वर्षाच्या तिसऱया तिमाहीच्या तुलनेत वाढला आहे. त्यावर्षी तो अनुक्रम 2.4 टक्के, 5.8 टक्के आणि 0.4 टक्के इतका होता. उत्पादन क्षेत्राची परिस्थिती सुधारल्यास शेवटच्या तिमाहीत विकासदरात सर्वसाधारण वाढ होऊ शकते, असे स्पष्ट करण्यात आले.
7 टक्क्यांची पातळी गाठणार
2022-2023 या आर्थिक वर्षाचा विकासदर वर्षाच्या शेवटी, अर्थात 31 मार्च 2023 पर्यंत एकंदर 7 टक्क्यांची मर्यादा गाठू शकेल असे अनुमान आहे. या संपूर्ण वर्षाची आकडेवारी या महिन्याच्या शेवटी हाती येणार आहे. मधल्या काळात हे अनुमान 6.8 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आले होते. तथापि, मागणी काही प्रमाणात वाढल्याने आता पुन्हा 7 टक्क्यांचे अनुमान घोषित झाले आहे. जागतिक आर्थिक मंदीमुळे निर्यात मंदावल्याचे अनुभवास येत आहे. दोन वर्षांचा कोरोना प्रभाव, युपेन-रशिया युद्ध आणि इतर जागतिक घटकांमुळे भारताच्याही विकासदराचे अनुमान काही प्रमाणात प्रभावित होणे स्वाभाविक असल्याचे मत आहे.
तरीही जगात सर्वोत्तम
भारताने या आर्थिक वर्षाच्या अखेर 7 टक्क्यांच्या विकासदराचा पल्ला गाठला तरी तो जगातील सर्वाधिक विकास दराचा देश ठरणार आहे. कारण अमेरिका, ब्रिटन, चीन, फ्रान्स, जर्मनी, जपान आदी मोठय़ा देशांच्या विकासदराच्या तुलनेत भारत बराच पुढे आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.









