पर्यटकांत होतेय गोव्याची बदनामी : अमलीपदार्थांचाही होतोय व्यवहार
प्रतिनिधी /पणजी
’स्लमडॉग मिलेनियर’ या प्रचंड गाजलेल्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे ‘गरीबांना भिकेला लावून स्वत: करोडपती बनणाऱ्या’ प्रवृत्तीची दुसरी आवृत्ती सध्या पणजीत सुरू असून गेल्या काही महिन्यांपासून राजधानीत भिक्षा मागणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाने हे ’भिकेचे डोहाळे’ दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे.
सध्यस्थितीत राजधानीच्या प्रत्येक भागात एक तरी भिकारी हमखास दिसून येतो. भिक मागणारी एखादी महिला असेल तर तिच्या कडेवर एक-दीड वर्षाचे मुलही हमखास दिसून येते. त्यावरून हे खरोखरचे भिकारी आहेत की कृत्रिमरित्या निर्माण केलेले भिकारी आहेत? असा प्रश्न उपस्थित होतो. शहराचा चर्च चौक, गार्सिया ऑर्ता गार्डन, डॉन बॉस्को हायस्कूल, महालक्ष्मी मंदिर, बसस्थानक, कॅसिनो तीर, मिरामार किनारा, गोवा मनोरंजन संस्थेच्या समोर, कांपाल बालभवन जवळील मैदाने आदी भागात त्यांचा वावर जास्त प्रमाणात दिसून येतो.
बालकांसह वयोवृद्धांचाही समावेश
या भिकाऱ्यांमध्ये धडधाकट महिला-पुऊषांच्या बरोबरीनेच वयोवृद्ध महिला तसेच सहा महिने ते दीड वर्षापर्यंतच्या वयाची बालकेही असतात. त्यातील अनेकजण स्वत: भिकारी नसल्याचे भासविण्यासाठी फुगे, खेळणी, झाडू यासारख्या वस्तू एखादी सायकल व ट्रायसायकलवर लादून विक्रेते असल्याचे दर्शवतात. परंतु दुपारी आणि रात्री एखाद्या चौकात उघड्यावरच मांडलेला त्यांचा जेवणाचा जो ‘थाट’ असतो तो पाहता केवळ फुगे विकून असे जेवण कुणी जेवू शकेल का? असा सवाल उपस्थित होतो. काही जणांना तर बियरची बाटली रिचविल्याशिवाय अन्न जात नाही अशीही परिस्थिती असते. त्यावरून एवढा पैसा येतो कुठून असाही प्रश्न उपस्थित होतो.
अमलीपदार्थांचाही होतो व्यवहार
खरे पाहता यातील अनेकजण हे केवळ नामधारी भिकारी वा फुगे विक्रेते असतात. या धंद्यांच्या आडून विविध प्रकारच्या अमलीपदार्थांची विक्री करणे व त्या निमित्ताने लोकांच्या पुढ्यात जाऊन अमलीपदार्थ विकणे हा त्यांचा मुख्य धंदा असतो. त्यातूनच भरभक्कम पैसा त्यांच्या हातात खेळत असतो. यातील अनेकांच्या मालकीच्या दुचाकी वाहनेसुद्धा असून शहरात विविध ठिकाणी पार्क करून ठेवलेल्या या वाहनांचा ते अमलीपदार्थ साठविण्याचे गोदाम म्हणून वापर करत असतात, असेही पाहणीत आढळून आले आहे.
मजेची गोष्ट म्हणजे एवढे सारे प्रकार खुलेआम घडत असताना व सर्वसामान्य लोकांनाही त्याबद्दल माहिती असताना पोलीस अनभिज्ञ कसे असू शकतात?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी पणजीच्या एका नगरसेवकाने अशा अनेक कथित ’भिकाऱ्यांना’ ड्रग्ज विकताना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याही पुढे जाताना त्यांनीच काही जणांना वाहनात घालून गोव्याच्या हद्दीवर नेऊन सोडले होते. परंतु ते लगेचच पुन्हा पणजीत आले होते, असे दिसून आल्याचे सदर नगसेवकानेच तऊण भारतला सांगितले होते.
भिकाऱ्यांमुळे गोव्याची प्रतिमा होतेय मलीन
अनेक भिकारी मात्र येथील स्थानिक तसेच पर्यटकांना जाम सतावत असल्याचे दिसून येते. राजधानीतील सर्व मोठी हॉटेल्स, अन्य आस्थापने, फुटपाथवरील शेवपुरी विक्रेत्यांचे गाळे, आईक्रीम पार्लर आदी ठिकाणी ठाण मांडून ते भिक मागत असतात. इफ्फीच्या काळात तर त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यात जास्त करून वयोवृद्ध महिला आणि बालकांचा समावेश असतो. त्यामुळे लोक दयेच्या भावनेतून भिक घालत असतात.
‘भिकेचा’ धंदा प्रचंड ‘श्रीमंतीचा’ रोजची कमाई किमान 1200 ऊपये!
या भिकेचे सुटे पैसे नंतर नोटांमध्ये बदलून घेण्यासाठी ते त्यांच्या ठराविक दुकानात जातात. अशाच एका प्रसिद्ध फार्मसिस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार असे एकेक भिकारी रोज तब्बल एक हजार ते बाराशे ऊपये सुद्धा त्यांच्याकडून नोटांच्या ऊपात बदलून घेत असतात. यावरून ‘भिकेचा’ हा धंदा किती ‘श्रीमंतीचा’ असावा, त्याचा अंदाज येतो.
या धंद्यात 100 टक्के लोक हे बिगर गोमंतकीय असल्यामुळे त्यांना लाजलज्जा बाळगण्याची गरज नसते. बिनदिक्कत कुणाहीसमोर जाऊन ते गयावया करू शकतात. त्यातून विनासायास आणि विनाश्रम भरभक्कम पैसे पदरात पाडून घेतात, आणि या सर्व व्यवहारात त्यांचे पडद्यामागील पोशिंदे त्यांचा हपापाचा माल गपापा करतात. हे सर्व प्रकार पाहता, पणजी महानगरपालिकेने याकडे गांभीर्याने पाहण्याची वेळ आली आहे. या भिकाऱ्यांच्या जाचातून पणजीची मुक्तता करण्यासाठी त्यांनी पोलिसांची मदत घेणे अनिवार्य ठरले आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास पणजीचे आणि पर्यायाने गोव्याचेही नाव देशविदेशात बदनाम होण्यास वेळ लागणार नाही.
अतिमद्यप्राशनाने भिकाऱ्याचा मृत्यू
या एकूण प्रकारात राजधानीचे नाव मात्र बदनाम होत आहे. येथे येणारा प्रत्येक पर्यटक ‘पणजी म्हणजे भिकाऱ्यांची ब्याद’ अशीच खुणगाठ बांधत परतीची वाट धरत असतो. अशाच एका प्रकारात काल मंगळवारी राजधानीतील प्रसिद्ध फिडाल्गो हॉटेलच्या समोर एक भिकारी मृतावस्थेत आढळून आला. त्याच्या शेजारी असलेली दाऊची बाटली पाहता प्रथमदर्शनी अतिमद्यप्राशनाने त्याचा मृत्यू झाल्याचे दिसून येत होते. नंतर पोलिसांनी येऊन त्याचा पंचनामा केला.









