पाणीटंचाईची चाहूल, पाणी जपून वापरण्याची गरज
बेळगाव : यावर्षी बेळगाव जिल्ह्यासह परिसरात कमी पाऊस झाला आहे. यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची शक्यता वर्तविली जात आहे. मर्यादेपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतीला तर फटका बसलाच आहे, त्याचबरोबर जिल्ह्यातील भूजल पातळीही खालावली आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासूनच पाण्याचा जपून वापर करावा लागणार आहे. दरवर्षी एप्रिल-मे महिन्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. परंतु, यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. बैलहोंगल, मुडलगी या तालुक्यांमध्ये पाण्याची भीषण समस्या निर्माण होऊ शकते. शेतीसह उद्योग व पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा केला जातो. परंतु, यावर्षी पाऊस नसल्याने भूजल पातळी खालावली आहे.
भूजल पातळी मोजण्यासाठी 35 ठिकाणी खुल्या विहिरी व 75 कूपनलिकांमधील पाणीपातळीची तपासणी करण्यात आली. यामध्ये जिल्ह्यातील भूजल साठ्याचे प्रमाण खालावल्याचे दिसून आले आहे. ऑक्टोबर 2019 मध्ये निपाणी तालुक्यात पाण्याची पातळी 18.63 मीटर इतकी होती. सध्या तरी 44.69 मीटरपर्यंत खाली गेली आहे. याबरोबरच जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही भूजल पातळी खालावल्याने पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हा भूजल कार्यालयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मल्लिकार्जुन बळीगार यांनी सांगितले, की यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाला. पाऊस कमी झाल्याने जमिनीत पाणीभरण झाले नाही. यामुळे भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे नागरिकांना आतापासूनच पाणी जपून वापरावे लागणार आहे.