प्रशासनाचे मात्र ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’: ‘आमचे कोण ऐकतो’ म्हणून दुर्लक्ष नको : मौन सोडून प्रशासनाला प्रश्न विचारण्याची वेळ 
बेळगाव : कधी गतिरोधक नसणे, कधी अशास्त्राrय पद्धतीने गतिरोधक तयार करणे, ख•dयात पाणी साचून ते ख•s दृष्टीस न पडणे, कधी गटारी उघड्या असणे, कधी ड्रेनेज चेंबरवर झाकण नसणे, कधी जिथे खोदकाम सुरू आहे त्याची पूर्वसूचना न देता तशा आशयाचे फलक न लावता काम सुरू ठेवणे अशा एक ना अनेक गोष्टींच्या दुर्लक्षामुळे आणि उदासिनतेमुळे निष्पापांचे मात्र बळी जात आहेत. ऋषिकेश कुलकर्णी याच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा हे विदारक वास्तव पुढे आले आहे.
ऋषिकेश सत्यप्रमोद कुलकर्णी हा अंगडी
कॉलेजचा विद्यार्थी. सावगाव येथे उभ्या केलेल्या अशास्त्राrय गतिरोधकामुळे तो दुचाकीवरून पडला आणि त्याच्या डोकीला जबर दुखापत झाली. त्याला त्वरित खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. तीन बहिणींमध्ये असणारा एकुलता एक मुलगा दगावल्याने त्याच्या पालकांची काय अवस्था झाली असावी, याची कल्पनाही आपल्याला करवत नाही. परंतु तेच ते आणि तेच ते, असेच सध्या बेळगावचे चित्र आहे. अपघात झाला की गतिरोधक नाही म्हणून त्या दिवसांपुरते आंदोलन होते. प्रशासन आणि मनपा घाईगडबडीत गतिरोधक उभे करते. मात्र, ते उभे करताना कोणत्याही शास्त्राrय पद्धतीचा विचार लक्षात घेतला जात नाही. कधी गतिरोधक नसल्यामुळे कॅम्पमध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू होतो तर कधी गतिरोधक अशास्त्राrय असल्यामुळे कोणा विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू होतो. पोलीस चौकशी होते, माध्यमांमध्ये वृत्त येते, आपण हळहळतो आणि पुन्हा सर्व काही जैसे थे होते.
वास्तव टाळता येत नाही
विद्यार्थी वाहन वेगाने चालवितात. त्यांना हेल्मेट घालण्याचा वैताग असतो. ते वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, हे वास्तव टाळता येणार नाही. त्याबाबत विद्यार्थ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहेच. परंतु प्रत्येक वेळी फक्त विद्यार्थ्यांचीच चूक असते असे म्हणता येणार नाही. आतापर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांचे नाहक बळी गेले आहेत ते केवळ अशास्त्राrय गतिरोधक, अवजड वाहनांनी दिलेली धडक, भरधाव वेगाने धावणाऱ्या बस यामुळे अधिक प्रमाणात झाले आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सहनशील बेळगावकरांमुळेच फावते…
महानगरपालिका, प्रशासन, सार्वजनिक बांधकाम खाते, पोलीस यंत्रणा, कंत्राटदार हे सर्व जण एकमेकांकडे बोट दाखवितात, हे नेहमीचेच आहे. दुर्दैवाने बेळगावकर इतके सहनशील आहेत की त्यामुळे प्रशासनाचे फावते आहे, हे आपण लक्षात घेत नाही आहोत. एखादी दुर्दैवी घटना घडली की दोन-चार संघटना उठतात, वृत्तपत्रांतील बातम्यांचाच संदर्भ देऊन किंवा कात्रणे दाखवून अधिकाऱ्यांना निवेदने देतात. चौकशीचे आश्वासन मिळते आणि पुन्हा सर्व काही जैसे थे. बेळगावमधील रस्ते आणि ख•s यांचा प्रश्न कधी तरी निकालात निघणार आहे की नाही?, सध्या पावसाळ्यामुळे शहरातील रस्त्यांची चाळण झालेली आहे. किमान मुरुम व खडी घालून ख•s बुजविल्यास काहीअंशी तरी अपघात रोखणे शक्य आहे. पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ करण्याचे नाटक, रस्ते दुरुस्त करण्याची सूचना केली जाते. मात्र, हे सर्व काही बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी.
सज्जनांचे मौन-दुर्जनांचे फावते
बेळगाव शहराचा स्मार्ट सिटी म्हणून समावेश करण्यात आला. मात्र, हा स्मार्टनेस कोणत्याही कामामध्ये अद्याप दिसून आलेला नाही. किंबहुना स्मार्ट सिटीचे अधिकारीच त्यांच्या कामामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अशा पद्धतीने जर स्मार्ट सिटीचे काम होत असेल तर आमचे शहर स्मार्ट नको परंतु सुरक्षित हवे आहे, अशी मागणी बेळगावकर फार पूर्वीपासून करत आहेत. परंतु पुन्हा तेच ‘आमचे कोण ऐकतो?’ म्हणून मौन बाळगून आहेत. सज्जनांनी मौन बाळगल्यामुळे दुर्जनांचे फावते हे लक्षात घेऊन बेळगाव शहराला मूलभूत सुविधा मिळण्यासाठी मौन सोडून प्रशासनाला प्रश्न करण्याची वेळ आली आहे.









