कुटुंबप्रमुख महिलेच्या खात्यात 2 हजार रुपये होणार जमा : अर्ज भरण्यासाठी प्रजा प्रतिनिधींची नेमणूक; अंगणवाडी-आशा कार्यकर्त्यांचीही मदत
बेळगाव, बेंगळूर ; राज्य काँग्रेसने निवडणुकीदरम्यान पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्यापैकी गृहलक्ष्मी योजनेला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे या योजनेचा शुभारंभ करणार आहेत. याअंतर्गत कुटुंबातील प्रमुख महिलेच्या बँक खात्यात दरमहा 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत. दरम्यान योजनेत पारदर्शकता यावी यासाठी प्रजा प्रतिनिधींची नेमणूक केली जाणार आहे.
गॅरंटी योजनांचा लाभ मिळविण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज भरणा नि:शुल्क असणार आहे. शिवाय अॅपद्वारे अर्ज भरण्यासाठी प्रजा प्रतिनिधी नेमण्यात येणार आहेत. यामध्ये स्वयंसेवक, अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांचा समावेश असणार आहे. ग्रामीण भागात अंगणवाडी आणि आशा कार्यकर्त्यांकडून गृहलक्ष्मी योजनेबाबतची माहिती संकलन केली जात आहे. बँक खाते, आधारकार्ड, कुटुंब प्रमुख महिलांचे छायाचित्र आदी माहिती संग्रहीत केली जात आहे. या योजनेसाठी महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे.
गृहलक्ष्मी योजनेचा अर्ज ग्राम वन, कर्नाटक वन आणि बेळगाव वनमध्ये उपलब्ध होणार आहे. सेवासिंधू पोर्टलद्वारे ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे. शिवाय मोबाईलद्वारेही अर्ज करता येणार आहे. मात्र, अद्याप या योजनेबाबत लाभार्थी अनभिज्ञ असल्याचे दिसत आहेत. या योजनेच्या लाभासाठी कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागणार, याबाबत जागृती आवश्यक आहे. सरकारने पाच गॅरंटी योजनांची घोषणा केली होती. त्यापैकी शक्ती, गृहज्योती, लागू केली आहे. त्यापाठोपाठ आता गृहलक्ष्मी योजनेसाठी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. कुटुंब प्रमुख असलेल्या महिलांना दरमहा 2 हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा होणार आहे.
अनेक समस्यांवर मात
राज्य काँग्रेसने निवडणुकीपूर्वी घोषणा केलेल्या पाच गॅरंटी योजनांपैकी तीन योजना अलीकडेच जारी झाल्या आहेत. उर्वरित दोन योजना जारी होण्याच्या टप्प्यात आहेत. पाचही गॅरंटी योजनांमध्ये अधिक प्रामुख्यता असलेल्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांनी खात्याची जबाबदारी मिळताच योजना यशस्वी करण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले आहेत.
1.28 कोटी महिलांना लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न
गृहलक्ष्मी योजनेसाठी सुमारे 30 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. या योजनेकरिता निधी उपलब्ध करण्याची जबाबदारी अर्थखाते सांभाळणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर आहे. परंतु, या योजनेसाठी अर्ज करण्यापासून विविध तांत्रिक समस्या निर्माण झाल्या होत्या. आता अधिकाऱ्यांच्या सहकार्याने या समस्या दूर करण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी स्वतंत्रपणे अॅपही तयार करण्यात आले असून त्याकरिता मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी तांत्रिक विभागाशी सातत्याने बैठका घेऊन चर्चा केली. बोगस अॅपपासून जनतेला सतर्क करण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर होते. राज्यातील 1.28 कोटी महिलांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एजंट आणि बोगस अर्जांपासून महिलांची फसवणूक होऊ नये, याकरिता प्रजा प्रतिनिधी नेमून त्यांच्यामार्फतही अॅपच्या माध्यमातून अर्ज भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व अर्ज प्रक्रिया मोफत असल्याचेही यापूर्वीच जाहीर करण्यात आले. बुधवार दि. 19 जुलैपासून या योजनेंतर्गत अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होत आहे.
बोगस अर्जांबाबत खबरदारी बाळगा : लक्ष्मी हेब्बाळकर
गृहलक्ष्मी योजनेसाठी सोशल मीडियावर बोगस अर्ज पसरविले जात आहेत. जनतेने याविषयी खबरदारी बाळगावी, असे आवाहन महिला-बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले आहे. गृहलक्ष्मी योजनेसाठी आतापर्यंत अर्ज प्रसिद्ध केलेले नाहीत. बोगस अर्ज व्हायरल करून काही समाजकंटक जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. बोगस अर्जांसंबंधी कारवाई करण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. बेंगळूर वन, ग्राम वन, कर्नाटक वन, बापूजी सेवा केंद्रांवर तसेच प्रजा प्रतिनिधींकडेच अर्जांची नोंदणी करावी, असेही त्यांनी सांगितले.









