आपण सध्या अभ्यासत असलेल्या फलश्रुतीच्या य: पठेत्प्रयतो नित्यं स गणेशो न संशयऽ । चतुर्थ्यां य: पठेद्भक्त्या सोऽपि मोक्षाय कल्पते ।। 47 ।। ह्या श्लोकात गणेशगीतेचे महात्म्य सांगताना असे म्हंटले आहे की, जो कुणी श्रद्धेने याचा नियमित पाठ करेल त्याचं साक्षात गणेशात रूपांतर होईल, एव्हढंच काय जो चतुर्थीच्या दिवशी ही गीता वाचेल त्यालाही मोक्ष मिळेल म्हणजेच त्याचेही आयुष्य समाधानात पार पडेल. त्याच्याही हातून योगसाधना बाप्पा करून घेतील व शेवटी त्याला त्यांच्या लोकात, म्हणजे स्वानंदलोकात स्थान देतील.
महापापी लोकांचाही उद्धार करण्याचे सामर्थ्य गणेशगीतेत आहे. केलेल्या पापाचा पश्चात्ताप होऊन, जो श्रद्धेनं गणेशगीता वाचेल त्याला सुबुद्धी होऊन पुढील आयुष्यात तो बाप्पांच्या उपदेशानुसार वागून मोक्ष मिळवेल. जो श्रद्धापूर्वक गणेशगीतेचे नियमित पठण करेल त्याच्यातील गणेशतत्वाचा अंश हळूहळू फुलू लागेल. गणेशगीतेतील उपदेश त्याच्या मनावर बिंबत जाईल व त्यानुसार वागत गेल्यामुळे त्याच्यावरील मायेचं आवरण गळून पडेल, त्याच्यावर असलेला त्रिगुणांचा प्रभाव संपेल व तो त्रिगुणांच्या पलीकडे जाऊन त्याचं बाप्पांच्यात रूपांतर होईल. थोडक्यात देव आणि मनुष्यात जो फरक आहे तो मिटवण्याचं सामर्थ्य गणेशगीतेत आहे. काही तिथींचं महात्म्य दांडगं असतं त्या दिवशी भक्त जे अनुष्ठान करतील त्याचं फळ कैकपटीनं मिळतं. जो चतुर्थीच्या दिवशी गणेशगीतेचं पठण करेल तोही मोक्षाचा अधिकारी होतो. पुढील श्लोकात गणेशक्षेत्राच्या महात्म्याबद्दल सांगितलंय,
तत्तक्षेत्रं समासाद्य स्नात्वाभ्यर्च्य गजाननम् ।
सकृद्गीतां पठन्भक्त्या ब्रह्मभूयाय कल्पते ।। 48 ।।
अर्थ- एखाद्या क्षेत्रामध्ये जाऊन स्नान करून गजाननाची पूजा केल्यावर भक्तीने एकदा गणेशगीतेचे पठण करेल तो ब्रह्मस्वरूप होण्यास योग्य होतो.
विवरण- अनेक गणेशक्षेत्र प्रसिध्द आहेत. मनुष्याला तेथे जाऊन दर्शन घेण्याचा योग आला की, तेथे गेल्यावर त्याने श्रद्धापूर्वक गणेशगीता जरूर वाचावी. त्याचं फळ म्हणून तो ब्रह्मस्वरूपाला योग्य होतो. अष्टविनायक इत्यादि गणेशक्षेत्रेही प्रसिद्ध आहेत. अशा गणेशक्षेत्रामध्ये अत्यंत श्रद्धेनं जो गणेशगीतेचे पठण करेल तो तेथील बाप्पांच्या विशेष प्रभावाने ब्रह्मस्वरूप होण्याला पात्र होईल. ही पात्रता मिळणे फार महत्त्वाचे आहे. पुढील श्लोकात गणेशचतुर्थीचं महात्म्य सांगितलंय,
भाद्रे मासे सिते पक्षे चतुर्थ्यां भक्तिमान्नरऽ ।
कृत्वा महीमयीं मूर्तिं गणेशस्य चतुर्भुजाम् ।। 49 ।।
सवाहनां सायुधां च समभ्यर्च्य यथाविधि ।
यऽ पठेत्सप्तकृत्वस्तु गीतामेतां प्रयत्नतऽ ।। 50।।
ददाति तस्य सन्तुष्टो गणेशो भोगमुत्तमम् ।
पुत्रान्पौत्रान्धनं धान्यं पशुरत्नादिसंपदऽ ।। 51 ।।
अर्थ- भाद्रपदमास शुद्ध चतुर्थीला जो भक्तिमान् मनुष्य चतुर्भुज, वाहनयुक्त व आयुधयुक्त अशी गणेशाची मातीची मूर्ती करून यथाविधि पूजा करून ही गीता लक्षपूर्वक सात वेळा पठण करतो त्याला बाप्पा संतुष्ट होऊन पुत्र, पौत्र, धन, धान्य, पशु, रत्नादि संपत्ति इत्यादि उत्तम भोग देतात.
विद्यार्थिनो भवेद्विद्या सुखार्थी सुखमाप्नुयात् ।
कामानन्याँल्लभेत्कामी मुक्तिमन्ते प्रयान्ति ते ।। 52 ।।
अर्थ- विद्यार्थ्याला विद्या प्राप्त होईल, सुखार्थ्याला सुख प्राप्त होईल, इच्छायुक्त मनुष्याच्या इच्छा पूर्ण होतील आणि ते सर्व अंती मोक्ष पावतील. श्रीगणेशगीता अध्याय अकरा समाप्त
श्रीगणेशगीता समाप्त








