उंब्रज / प्रतिनिधी :
कोल्हापूरच्या श्री क्षेत्र ज्योतिबा देवाच्या यात्रेत सातारा तालुक्यातील पाडळी गावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात्रेतील एक नंबरची सासनकाठी म्हणून पाडळी गावच्या सासनकाठीला मान आहे. यात्रेनिमित्त ही सासनकाठी जोतिबा डोंगराकडे रवाना झाली होती. त्यानंतर आज शनिवारी परतीच्या मार्गावर असताना उंब्रज तालुका कराड येथे या सासनकाठीचे आगमन झाले. यावेळी उंब्रजसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सासनकाठीच्या दर्शनासाठी गर्दी केली. अनेक ठिकाणी थांबून ग्रामस्थांनी या सासनकाठीचे दर्शन घेवून जोतिबा नावानं चांगभलं असा गजर केला.
शेकडो वर्षांच्या परंपरेनुसार पाडळी ता. सातारा येथील सासनकाठीला ज्योतिबा यात्रेत महत्त्वाचे स्थान आहे. मानाची व यात्रेतील क्रमांक एकची सासनकाठी म्हणून मान असतो. त्यामुळे संपूर्ण पाडळी ग्रामस्थ व ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्ट सासनकाठी १ भक्तगण जोतिबा यात्रेला वाजतगाजत उपवास करून अनवाणी पायाने चालत जोतिबा डोंगरावर ही सासनकाठी नेतात .त्यानंतर मुख्य यात्रेला सुरुवात होते. सोबत ३० ते ३५ बैलगाड्या पाडळीतून जातात. आज उंब्रज येथे आगमन झाले. परंपरेनुसार चोरे रोड येथील पै.प्रल्हाद जाधव यांच्या निवासस्थानी भाविकांचे स्वागत करण्यात आले.
अधिक वाचा : नॉट रिचेबल अजित पवार पोहोचले थेट सोन्याच्या दुकानात