महान रानकवी ना. धों. महानोरांच्या काव्याविष्काराच्या आठवणी ताज्या : कोल्हापूरसह इचलकरंजी, गारगोटी, उत्तूर, गडहिंग्लजमधील कार्यक्रमात सहभाग
कोल्हापूर प्रतिनिधी
साहित्य अकादमी पुरस्कार विजेते महान रानकवी नामदेव धोंडी तथा ना. धों. महानोर यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने मराठी मनाला निसर्गाशी जोडणारा रानकवी आपल्या असंख्य कविता, गाणी पाठीमागे ठेवून काळाच्या पडद्याआड गेला. गेली सहा दशके मराठी काव्य साहित्यावर आपल्या शब्दफुलांनी अमीट ठसा निर्माण करणाऱ्या ना. धों. चा कलाकारांची, साहित्यिकांची, लेखकांची, कवींची नगरी असलेल्या कोल्हापूरच्या मातीशी वेगळे नाते होते. कोल्हापूरचे सुपुत्र ‘ययाती’कार ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्याशी त्यांचा विशेष जिव्हाळा होता. कोल्हापुरातील अनेक कवी, साहित्यिक, लेखकांशी त्यांचा संपर्क आणि संवाद होता. ना. धों.च्या जाण्याने कोल्हापुरातील त्यांच्या काव्यरूपी वावराच्या आठवणी ताज्या झाल्या.
इचलकरंजीतील मराठी साहित्य संमेलन, यशवंतराव आणि ना. धों.
1974 साली वस्त्रनगरी इचलकरंजीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. महाराष्ट्राचं लाडक व्यक्तीमत्व विनोदी लेखक, साहित्यिक पु. ल. देशपांडे या संमेलनाचे अध्यक्ष होते. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री तथा तत्कालिन उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाणही या संमेलनाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. ना. धों. यांनी या संमेलनात सादर केलेल्या कविता उपस्थितांच्या टाळ्या घेऊन गेल्या होत्या. साहित्यप्रेमी चव्हाण साहेबांनीही ना. धों. कवितांचे कौतुक केले हेते. ही आठवण शिवाजी विद्यापीठातील मराठी विभागातील प्रा. डॉ. रणधीर शिंदे यांनी ‘तरुण भारत संवाद’ शी बोलताना ताजी केली. या संमेलनातील सहभागानंतर ना. धों. यांचा पुढील काळात कोल्हापुरातील वावर आणि संवाद वाढला. त्यांचे हजारो चाहते करवीर नगरीत तयार झाले.
ना. धों.ना कोल्हापुरात यायला आवडत असे. ज्ञानपीठ विजेत्या वि. स. खांडेकरांशी त्यांच्याविषयी त्यांना ओढ, जिव्हाळा होतो. कोल्हापुरातील जुन्या काळातील, समकालिन लेखक, कवींच्या निर्मितीबद्दल ते नेहमी आदराने बोलत असत. जुन्या, नव्या पिढीतील लेखक, कवी, अभ्यासक, प्राध्यापकांशी त्यांनी काव्य निर्मितीच्या माध्यमातून संपर्क ठेवला होता. त्यामध्ये साहित्य अकादमी विजेते ज्येठ साहित्यिक लेखक प्रा. डॉ. राजन गवस, लोककला, लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रणधीर शिंदे, संत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. सुजय पाटील यांच्यासह गोकुळचे माजी चेअरमन अरुण नरके, गडहिंग्लजच्या जनता दलाचे नेते श्रीपतराव शिंदे , यांच्याशी त्यांचा ऋणानुबंध होता. शिवाजी विद्यापीठातील कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावून मार्गदर्शन केले हाते. कोल्हापूर महापालिकेच्या प्रसिद्ध राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील पुष्पही त्यांनी गुंफले होते. गडहिंग्लजच्या साने गुरूजी व्याख्यान मालेत आणि आजरा तालुक्यातील उत्तुर येथील साहित्य संमेलनातही त्यांनी आपल्या कवितांनी साहित्यरसिकांना मंत्रमुग्ध केले होते. कोल्हापूर लगत आणि सांगली जिल्ह्यातील दत्तात्रयाचे स्थान असलेल्या औंदूंबर गावातील ‘औदूंबर साहित्य संमेलना’चे अध्यक्षस्थान भूषविण्याचा बहुमानही ना. धों. ना लाभ होता. कोल्हापुरातील एका कलाकाराने त्यांना निसर्गचित्राचे पेटिंग भेट दिले होते. ते त्यांनी आनंदाने आपल्या घरातील दर्शनी भागात लावले आहे. ना. धों.नी आपल्या पत्नीवर ‘सुलोचनेविषयी’ नामक पुस्तक लिहले होते. त्याच्या प्रकाशनाला कोल्हापुरातील त्यांचे चाहते, प्राध्यापक मंडळी उपस्थित होती.
शंभर वर्षांच्या कविता अन् ना. धों. चा काव्याविष्कार
2004 साली गोकुळचे माजी चेअरमन साहित्यरसिक अरुण नरके यांच्या पुढाकाराने पुढाकाराने राजारामपुरी साईक्स एक्स्टेंशन येथील आप्पाज् कॉम्प्लेक्समध्ये ‘शंभर वर्षातील कविता’ शीर्षकाखाली काव्यवाचनाचा कार्यक्रम झाला होता. यामध्ये ना. धों. यांच्या कविता आणि कवितांची झालेली गाणी गाजली होती. नरके यांच्याशी ना. धों.चा स्नेह होता. कौटुंबीक नाते होते. ना. धों.च्या जाण्याच्या वृत्तानंतर प्रतिक्रिया देताना अरुण नरके यांचे डोळे आपसूक पाणवले.
आईच्या मांडीवर बसून ओव्या ऐकत नामदेव कवी झाला
ना. धों. महानोर यांच्या मातोश्री कधी शाळेत गेल्या नाहीत पण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रमाणे त्या ओव्या, अंभग म्हणायच्या. त्या लहानपणी ना. धों. यांनी आईच्या मांडीवर बसून ऐकल्या होत्या. त्याचा प्रभाव आपल्यवर पडल्याचे ना. धों. सर सांगत असत. कविता कशी करावी?, कशी समजून घ्यावी?, तिचे सादरीकरण कसे करावे? हे सांगणारे ना. धों.सर चालते बोलते विद्यापीठ होते, अशा शब्दात प्रा. डॉ. सुजय पाटील यांनी आठवण विषद केली.
महाकवी, मोठा माणूस, दिलदार व्यक्तीमत्व : डॉ. राजन गवस
ना. धों. महानोर महानकवी होते, माणूस म्हणून मोठे होते, दिलदार होते. त्यांच्याशी आमचे कौटुंबीक नाते होते. शेतकऱ्याचा मुलगा असणारे ना. धों. साहित्यिक, कवी, शेतकरी होते. राजकारणात त्यांचा वावर होता. फलोद्यान योजना त्यांनी आमदार असताना आग्रही भूमिका घेत सरकारकडून मंजूर करून घेतली. ज्येष्ठ नेते (कै.) यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी त्यांचा स्नेह होता. राज्यात प्रकाशित होणारी मासिके टिकावीत, म्हणून त्यांना सरकारी अनुदान मंजूर करून घेण्यातही ना. धों. यांनी यशस्वी पुढाकार घेतला होता. गोव्याकडे जाताना ते गारगोटीत आम्हाला भेटल्या शिवाय पुढे जात नसत, अशा शब्दात साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक, लेखक डॉ. राजन गवस यांनी आपल्या भावना प्रतिक्रिया देताना मांडलया.








