विक्की कौशल अन् मानुषी छिल्लरचा चित्रपट
‘द ग्रेट इंडियन फॅमिली’ हा चित्रपट 22 सप्टेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यशराज फिल्म्सकडून निर्मित या चित्रपटात विक्की कौशल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्णा आचार्य यांनी केले आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाशी संबंधित एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट केला आहे.
यात विक्की कौशल प्रेक्षकांना स्वत:च्या वेड्या कुटुंबाची एक झलक दाखविताना दिसून येत आहे. विक्की सोबत या चित्रपटात मानुषी छिल्लर देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

विक्की कौशलचा ‘जरा हटके, जरा बचके’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता. या चित्रपटात तो सारा अली खानसोबत दिसून आला होता, त्यांच्या या जोडीला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. याचबरोबर विक्की आता द ग्रेट इंडियन फॅमिलीमध्ये नव्या अभिनेत्रीसोबत मोठ्या पडद्यावर दिसून येणार असल्याने त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत.
विक्की कौशल हा उत्तम पटकथांना प्राधान्य देत असल्याने त्याच्या चित्रपटांबद्दल नेहमीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता असते. यापूर्वी त्याने उरी, मसान, राजी, संजू, सरदार उधम, मनमर्जियां, जरा हटके जरा बचके यासारख्या चित्रपटांद्वारे स्वत:ची अभिनयक्षमता सिद्ध केली आहे. तर मानुषीला या चित्रपटाद्वारे स्वत:ची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली असल्याचे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.









