राष्ट्रीय अधिवेशनात काँग्रेसची रणनीती जाहीर ः विभाग पातळीवर निदर्शने करणार
वृत्तसंस्था / रायपूर
अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाबाबत काँग्रेस सातत्याने केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहे. येत्या काही दिवसांत याप्रकरणी सरकारला घेरण्याची व्यूहरचनाही काँग्रेसने तयार केली आहे. काँग्रेसच्या आगामी कार्यक्रमानुसार 6 मार्च रोजी अदानी प्रकरणाबाबत पक्ष देशभरात विभाग पातळीवर आंदोलन करणार आहे. यासोबतच अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱया सत्रातही हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. छत्तीसगडमध्ये आयोजित पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात यासंबंधी पक्षाध्यक्ष खर्गे यांच्यासह राहुल गांधी यांनी सरकारवर तोफ डागताना पुढील रणनीती जाहीर केली.
येत्या 13 मार्चपासून सुरू होणाऱया संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱया सत्रादरम्यान सर्व राज्यांमध्ये राजभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हेही येत्या काही दिवसांत जिल्हास्तरावर अनेक सभा घेणार आहेत. काँग्रेसने रविवारी अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार करत सरकार समर्थित खासगी मक्तेदारीच्या विरोधात आवाज बुलंद केला.
राहुल गांधींचा पंतप्रधानांवर निशाणा
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही रविवारी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. अदानी समूहाशी संबंधित प्रकरणाचे सत्य समोर येईपर्यंत आपला पक्ष याबाबत आवाज उठवत राहील, असे राहुल गांधी म्हणाले. पक्षाच्या अधिवेशनात भाषण करताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी हे एकच असून सर्व पैसा एकाच व्यक्तीकडे जात असल्याचा आरोप केला. गेल्या काही आठवडय़ात झालेल्या अदानी मेगा घोटाळय़ानंतर आम्ही सरकारला त्याच्या जबाबदारीपासून पळ काढू देऊ शकत नाही. राहुल गांधींचे प्रश्न आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या भाषणाचा मोठा भाग सरकारच्या सांगण्यावरून संसदेच्या रेकॉर्डमधून एकतर्फी काढून टाकण्यात आला, पण संसदेत काय चालले आहे ते भारतातील जनता पाहत आहे, असे भाष्यही यावेळी करण्यात आले. अधिवेशनाच्या दुसऱया दिवशी काँग्रेसने पारित केलेल्या आर्थिक ठरावात आपला अशा मक्तेदारींच्या विरोधात असल्याचे म्हटले होते.
अरुणाचल ते गुजरात भारत जोडो यात्रा काढणार
राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने पहिली भारत जोडो यात्रा गेल्या काही महिन्यात यशस्वी केल्यानंतर आता अरुणाचल प्रदेश ते गुजरातपर्यंत दुसरी भारत जोडो यात्रा काढण्यात येणार असल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितले. छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे सुरू असलेल्या काँग्रेसच्या 85 व्या अधिवेशनाच्या तिसऱया आणि शेवटच्या दिवशी त्यांनी पत्रकारांना यासंबंधी माहिती दिली.
‘घर नाही’ म्हणताच सोनिया भावुक
राहुल गांधी यांनी 32 मिनिटे भाषण केले. यावेळी त्यांनी भारत जोडो यात्रा, अदानी हिंडेनबर्ग प्रकरण, जयशंकर यांचे चीनवरील वक्तव्य आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीसह अनेक मुद्यांवर भाष्य केले. आपल्या भाषणात राहुल यांनी 1977 ची घटनाही कथन केली. यात त्यांना पहिल्यांदाच लक्षात आले की आपल्याकडे स्वतःचे घर नाही. 52 वर्षे झाली तरी अजूनही माझ्याकडे घर नाही असे राहुल गांधी म्हणाले. त्यांचे भाषण ऐकून सोनिया गांधी भावूक झालेल्या दिसून आल्या.
महिला, तरुण, एसटी-एससी यांना 50 टक्के स्थान ः खर्गे
पुढील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महिला, युवक आणि एसटी-एससी वर्गातील उमेदवारांना 50 टक्के जागा दिल्या जातील, असे पक्षाध्यक्ष खर्गे यांनी जाहीर केले आहे. अधिवेशनात अनेक विषयांवर चर्चा झाल्यामुळे पक्ष मजबूत होईल. आम्ही मंजूर केलेल्या प्रस्तावांमुळे देशात नवा इतिहास घडेल. ज्या राज्यांमध्ये आमची सरकारे बनतील, तेथे नवीन प्रस्तावांवर काम केले जाईल, जिथे सरकार नसेल, तेथे विरोधी पक्षात राहून हे मुद्दे मांडले जातील, असेही खर्गे यांनी सांगितले.
लोकांना समजवणे हे आमचे काम ः प्रियांका
ज्या लोकांना देशाचे राजकारण पाहून काहीतरी चूक होत असल्याचे समजतात अशा लोकांना व्यासपीठ देणे आमचे काम आहे. त्यांचा आवाज बुलंद करणे हे आमचे काम आहे. तसेच ज्यांना हे समजत नाही त्यांना हे आम्ही समजावून सांगत असून ही खूप मोठी जबाबदारी असल्याचे प्रियांका वाड्रा म्हणाल्या. आम्हाला भाजपच्या विचारसरणीविरुद्ध एकजुटीने लढायचे आहे. काही मोजके उद्योगपती पुढे जात आहेत. शेतकऱयांची कर्जे माफ होत नाहीत आणि उद्योगपतींचे कर्ज माफ केले जात आहे. ही स्थिती आम्हाला मान्य नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले.









