पालकमंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : बेळगाव मनपाच्या महापौर शोभा सोमणाचे यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे. याला सरकारच योग्य उत्तर देईल, असे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. बेंगळूर विकाससौध येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. मालमत्ता करवाढीसंदर्भातील माहिती देताना अधिकाऱ्यांकडून छोटीशी चूक झाली आहे. लहान चूक असली तरी त्याचा मोठा बाऊ केला जात आहे. स्थानिक आमदारांकडून गरज नसताना महापौरांकडून राज्यपालांना पत्र लिहिण्यास दबाव घालण्यात आला आहे, असा आरोप जारकीहोळी यांनी केला. महापौर सोमणाचे या आमदाराच्या हातातील बाहुले बनल्या आहेत. आमदार अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करीत आहेत. अधिकाऱ्यांवर आरोप ठेवून केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत चौकशी करणार असल्याचे सांगितले आहे. हे नियमात बसत नाही. अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर काम केले तर राज्य सरकारकडूनच चौकशी केली जाते. याची माहिती सरकारला द्यायची होती? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. आमदाराकडून मालमत्ता कर दुरुस्तीसंदर्भातील फाईल झाकून ठेवण्यात आली आहे. हा विषय घेऊन त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली तरी आश्चर्य नाही, असा टोलाही त्यांनी मारला.









