बसवजयमृत्युंजय स्वामीजी यांची पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांकडे मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
लिंगायत पंचमसाली समाजाचा आरक्षणाचा लढा हा वैज्ञानिक असल्याचे जाहीर करून समाजाचा मोठा अवमान केला आहे. पंचमसाली समाजाचा 2 ए मध्ये समावेश करण्याची मागणी घटनाबाह्या आहे, असा दावा सरकारने केला आहे. हे वक्तव्य मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तात्काळ मागे घेऊन समाजाची माफी मागावी, अशी मागणी कुडलसंगम पीठाचे श्री बसवजयमृत्युंजय स्वामी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
लिंगायत समाजामार्फत मागील कित्येक वर्षांपासून ही मागणी सुरू आहे. आता हा लढा क्रांती लढा म्हणून अधिक तीव्रपणे सुरू राहणार आहे. पंचमसाली समाजाचा संघर्ष दडपण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहेत. मात्र सरकारच्या मंत्रीमंडळात लिंगायत समाजातील प्रतिनिधी आहेत. सरकारला आरक्षण द्यायचे नसल्यास आता जनतेच्या दरबारात जाणार आहे. 900 वर्षांचा इतिहास असलेल्या लिंगायत समाजाचा अपमान झाला आहे. त्यामुळे हा लढा आता अधिक तीव्र केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 16 रोजी धरणे आंदोलन
डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या संविधानानुसार पंचमसाली समाजाचे आंदोलन सुरू आहे. मात्र सरकारकडून हे आंदोलन दडपण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान सरकारने हे आंदोलन असंविधानिक असल्याचे सांगितल्याने समाजाच्या मूलभूत अधिकारावर गदा आल्याचीही खंत स्वामीजींनी यावेळी व्यक्त केली. पंचमसाली समाजातर्फे सोमवार दि. 16 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरण्यात येणार असल्याची माहिती स्वामीजींनी यावेळी दिली.









