खासदार हरभजन सिंह यांची राज्यसभेत मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाबमधून आम आदमी पक्षाच्या वतीने राज्यसभेत पोहोचलेले खासदार तसेच माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह यांनी अफगाणमधील शिखांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. तालिबानची राजवट आल्यावर अफगाणिस्तानात केवळ 150 शिख शिल्लक राहिले आहेत. केंद्र सरकारने त्यांच्या सुरक्षेकरता गांभीर्य दाखवावे असे हरभजन यांनी बुधवारी राज्यसभेत म्हटले आहे.
अफगाणिस्तानात शिख आणि गुरुद्वारांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे शिखांच्या भावना दुखावत आहेत. कोरोना संकटादरम्यान गुरुद्वारांनी केवळ अन्नच नव्हे तर ऑक्सिजन देखील पुरविला आहे, तरीही शिखांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे हरभजन म्हणाले.
देशाचे स्वातंत्र्य, जीडीपी, रोजगार आणि दान-धर्मात शिख समुदाय नेहमीच पुढे राहिला आहे. शिख समुदाय भारत आणि अन्य देशांच्या संबंधांमधील बळकट धागा ठरला आहे. शिख हे साहस आणि पराक्रमासाठी ओळखले जातात. मग आमच्यासोबत अशी वागणूक का असे प्रश्नार्थक विधान हरभजन यांनी राज्यसभेत केले आहे.
शिखांवर सातत्याने हल्ले
18 जून रोजी काबूलमधील गुरुद्वारामध्ये अनेक स्फोट झाले. तेथील परिसरात गोळीबार झाला आणि यात 2 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले. 25 मार्च 2020 रोजी इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी रायसाहिब गुरुद्वारावर हल्ला केला. या हल्ल्यात 25 शिखांना जीव गमवावा लागला. 2018 मध्ये जलालाबाद शहरात हल्ला झाला होता असे खासदारांनी नमूद केले आहे.
आता केवळ 150 शिल्ल्क
अफगाणिस्तान हे कधीकाळी हजारो शिख आणि हिंदूंचे वास्तव्य असलेले ठिकाण होते. परंतु आता ही संख्या मूठभर राहिली आहे. 1980 च्या दशकात 2.20 लाख शिख आणि हिंदू तेथे राहत होते. 1990 च्या दशकात हा आकडा 15 हजार आणि 2015 मध्ये 1350 वर आला. जलालाबाद येथील हल्ल्यावेळी 1500 शिख तेथे होते. तालिबानची राजवट परतल्यापासून आता तेथे केवळ 150 च्या आसपास शिखांचे वास्तव्य असल्याचे हरभजन यांनी म्हटले आहे.









