कोमुनिदाद संस्थांची मागणी, राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांना निवेदन देणार
पणजी : कोमुनिदाद जमिनीतील घरे व बांधकामे कायदेशीर करण्याची तयारी सरकारने चालवली असली तरी सरकारच्या या निर्णयाविऊद्ध कोमुनिदाद संस्थांनी छड्डू ठोकले आहेत. पावसाळी विधानसभा अधिवेशनात सरकारने कोमुनिदाद जमिनीतील घरे व बांधकामे कायदेशीर करण्यासाठी आणलेले विधेयक पाठिमागे घ्यावे, यासाठी राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांना निवेदन देण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी दिली. पणजी येथील कोमुनिदादच्या कार्यालयात काल गुऊवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला कोमुनिदादीचे अॅटर्नी जुआंव मिनेझीस, आसगाव कोमुनिदादचे अॅटर्नी नेल्सन फर्नांडिस व बहुसंख्य कोमुनिदाद प्रतिनिधींनी सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.
आमदार वेन्झी व्हिएगस म्हणाले, सरकारच्या कोमुनिदाद कायद्याचा अभ्यास करून पुढील दहा दिवसांत कृती ठरविण्यात येणार आहे. कोमुनिदादच्या जमिनी ह्या सरकारच्या जमिनी नाहीत. कोमुनिदादींना विश्वासात न घेता परस्पर विधेयक संमत करण्यात आले असल्याने हा प्रकार अयोग्य आहे. राज्यातील सर्व कोमुनिदादी रविवारपूर्वी विधेयकाला विरोध करणारा ठराव संमत करतील. 24 ऑगस्ट रोजी पर्वरी येथील सेंट झेवियर रिसर्च सेंटरमध्ये बैठक होईल. कोमुनिदाद कायदा व विधानसभेत संमत झालेल्या विधेयकावर राज्यातील तज्ञ वकील अभ्यास करीत असल्याचे जुआंव कोमुनिदादीचे अॅटर्नी सुकूर मिनेझीस म्हणाले.









