शिक्षणतज्ञ प्रा. रमेश पानसे यांनी व्यक्त केलेले मत
प्रतिनिधी /काणकोण
बालशिक्षणाचा पाया जर मजबूत असेल, तर माणूस पुढे समृद्ध आणि सुसंस्कृत बनू शकेल. त्यासाठी बालशिक्षण हे योग्य पद्धतीने हाताळायला हवे आणि सरकारला देखील त्यात अधिक गुंतवणूक करण्यास भाग पाडायला हवे, असे मत शास्त्रीय बालशिक्षण चळवळीतले अग्रणी प्रा. रमेश पानसे यांनी पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयात ‘पायाभूत शिक्षण का व कसे ?’ या विषयावर बोलताना मांडले.
राजकारण्यांना शिक्षण सोडून बाकीचे सर्व काही कळते. त्यामुळे सरकारला बालशिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याची गरज आहे. अर्थात त्याची फलश्रुती मिळायला विलंब लागू शकेल. मुळातच बालशिक्षण हे माणसाच्या मेंदूवर अवलंबून आहे. मुलांचा मेंदू साधारणपणे आठ वर्षांपर्यंत परिपक्व होत असतो. म्हणूनच सहाच्या ऐवजी आठव्या वर्षी बालशिक्षणावर भर देण्यात आला आहे. मुलांची आकलनशक्ती समजून घेऊन शिक्षक आणि पालकांनी कार्यरत राहावे, असे प्रा. पानसे पुढे म्हणाले. गोमंतक बालशिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. नारायण देसाई यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रद्धानंद ज्ञानप्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भट यांनी स्वागत केले. कमलाकर म्हाळशी यांनी प्रास्ताविक केले, तर श्रद्धानंद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमा प्रभुगावकर, संस्थेचे सचिव सुनील पैंगणकर यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ प्रदान केले. यावेळी म्हाळशी यांच्या हस्ते प्रा. पानसे यांचा सन्मान करण्यात आला. संपदा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. गोमंतक बालशिक्षण परिषदेच्या सुरेखा दीक्षित त्याचप्रमाणे काणकोण तालुक्यातील विविध माध्यमिक शाळा तसेच सरकारी प्राथमिक शाळांतील शिक्षक या व्याख्यानाला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.









