पुणे / प्रतिनिधी :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार जोरदारपणे काम करीत आहे. मात्र, धडाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे आमची गाडी सुसाट सुटली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या धडाडीचे कौतुक केले. दरम्यान, राज्यातल्या जनतेच्या कल्याणासाठी आम्ही कटिबद्ध असून जेजुरी येथील ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमात भंडारा उधळत राज्यातल्या बारा बलुतेदारांचे कल्याण होऊ दे, असे साकडे घातल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
जेजुरीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले. आज शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन जेजुरी येथे करण्यात आले होते. या निमित्ताने ते जेजुरीत आले होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी खंडेरायाचे दर्शन घेतले. श्री तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्यानुसार पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी फडणवीस म्हणाले, विठोबा आणि खंडोबाला मागणी केली की ती पूर्ण होते. आता लोकांनी चकरा मारायच्या नाहीत. आता शासन थेट लोकांपर्यंत जात आहे. आपण एका-एका जिल्ह्यात एक हजार कोटी रुपयांपर्यंतची कामे केली आहेत. येत्या तीन वर्षात शेतकऱ्यांना सोलरवर वीज देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बारा तास वीज मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.








