विदेशमंत्री एस. जयशंकर यांची अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी घेतली भेट : कतारमध्ये ठोठावण्यात आला आहे मृत्यूदंड
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कतारमधील एका न्यायालयाकडून भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना मृत्युदंड ठोठावण्यात आल्याने चिंता व्यक्त होत आहे. याचदरम्यान विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी या नौदलाच्या माजी अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. जयशंकर यांनी ट्विट करत यासंबंधी माहिती दिली आहे. विदेशमंत्र्यांची भेट घेतल्यावर या माजी अधिकाऱ्यांची लवकरच मुक्तत होईल अशी अपेक्षा त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. भारतीय नागरिकांच्या मुक्ततेसाठी सरकार शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे विदेशमंत्र्यांनी स्पष्ट पेले आहे.
यापूर्वी आम्हाला संबंधित निर्णयाची प्रत मिळालेली नाही असे सरकारकडून सांगण्यात आले होते. या निर्णयाच्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्यासमवेत विविध पर्यायांवर विचार भारत सरकारकडून केला जात आहे. कतारमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या 8 भारतीयांच्या कुटुंबीयांची सोमवारी सकाळी भेट घेतली आहे. सरकार या प्रकरणाला सर्वोच्च महत्त्व देत आहे. कुटुंबीयांची चिंता आम्ही जाणून आहोत. या भारतीयांच्या मुक्ततेसाठी भारत सरकार स्वत:चे प्रयत्न सुरूच ठेवणार आहे. त्यासंबंधी त्यांच्या कुटुंबीयांसोबत संपर्क अन् समन्वय कायम राखणार आहोत असे विदेशमंत्री जयशंकर यांनी स्वत:च्या ट्विटमध्ये नमूद पेले आहे.
कतारकडून टिप्पणी नाही
याप्रकरणी न्यायालयाच्या निर्णयावर कतारकडून अद्याप कुठलीच टिप्पणी करण्यात आलेली नाही. निर्णयाच्या सखोल विश्लेषणानंतर भारत स्वत:समोरील पर्यायांवर पाऊल टाकणार आहे. कूटनीतिक मार्गाने देखील हे प्रकरण सोडविण्याचा विचार उच्चस्तरावर सुरू आहे. भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना कतारच्या न्यायालयाकडून 26 ऑक्टोबर रोजी मृत्युदंड ठोठावण्यात आला होता. या निर्णयाने आम्ही अत्यंत हैराण आहोत. याप्रकरणी सर्व कायदेशीर पर्यायांवर आम्ही विचार करत आहोत असे भारताने म्हटले होते. हे सर्व 8 भारतीय नागरिक हे अल दाहरा कंपनीचे कर्मचारी आहेत. या भारतीयांना मागील वर्षी हेरगिरीच्या कथित प्रकरणी अटक करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण
कतारच्या अल दाहरा या खासगी कंपनीत हे भारतीय कार्यरत होते. या कंपनीकडून कतारच्या नौदलाला प्रशिक्षण आणि लॉजिस्टिकमध्ये मदत करण्याचे काम केले जात होते. परंतु मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात या भारतीय नागरिकांना हेरगिरीच्या एका प्रकरणी अटक करण्यात आली होती. इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप या भारतीयांवर आहे. याप्रकरणी कतार तसेच भारतीय अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कुठले आरोप आहेत हे जाहीर केलेले नाही.
शिक्षेविरोधात दाद मागण्याचा अधिकार
8 ही भारतीयांकडे मृत्युदंडाच्या विरोधात दाद मागण्याचा अधिकार आहे. परंतु कतारकडून यासंबंधी कुठलीही टिप्पणी करणे प्रकर्षाने टाळण्यात आले आहे. कॅप्टन नवतेज सिंह, कॅप्टन सौरभ वशिष्ठ, कमांडर पुर्णेन्दु तिवारी, कॅप्टन वीरेंद्र कुमार वर्मा, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता, कमांडर अमित नागपाल आणि नाविक रागेश अशी या आठ भारतीयांची नावे आहेत.









