वीजमंत्री सुदिन ढवळीकर : प्रशासन तुमच्या दारी कार्यक्रमास म्हापशात उदंड प्रतिसाद : कायदा सुव्यस्था राखून जनतेला न्याय देण्याची गरज
म्हापसा : प्रत्येक खात्यात सुसूत्रता आणायची असेल तर तर प्रत्येक अधिकाऱ्याने लोकप्रतिनिधीने आपल्यापरीने कायदा-सुव्यवस्था राखून जनतेचे सहकार्य घेऊन योग्य नियोजन केल्यास लोकांची कामे सहज होऊ शकतात. नागरिकांनी कोणत्याही खात्याचा प्रश्न घेऊन आल्यास, त्यासाठी सरकार ‘प्रशासन तुमच्या दारी’ उपक्रमाच्या माध्यमातून जनतेला योग्य न्याय व निवाडा देण्यास सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयात बोलताना सांगितले. यावेळी व्यासपीठावर उपसभापती जोशुआ डिसोझा, साळगाव आमदार केदार नाईक, हळदोणा आमदार कार्लुस आल्वारीस, नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, उपनगराध्यक्ष विराज फडके, सचिव संजीव जोगळेकर, एनआरआय संचालक आलेक्स डिकॉस्ता, वीज खात्याचे मुख्य अभियंता स्टिफन फर्नांडिस, उपजिल्हाधिकारी एस. टी. देसाई आदी उपस्थित होते. लोकप्रतिनिधींनी तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी जनतेला प्रामाणिकपणे सेवा दिली पाहिजे, कारण ते आमचे कामच आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार व्यवस्थितपणे सुरू आहे, असेही मंत्री ढवळीकर म्हणाले.
राज्यात 150 मेगाबाईट वीज तयार करणार!
पंतप्रधान मोदींनी ‘स्वयंपूर्ण भारत’चा संकल्प केला आहे. वीज खात्यात 150 मेगाबाईट पॉवर 2030 पर्यंत राज्यात करणार आहोत. येणाऱ्या काळात जी समस्या निर्माण होते ती समस्या कशी कमी करणार, याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देणार आहोत. 150 मेगाबाईट वीज ही राज्यात तयार होणार, यात दुमत नाही. मात्र संपूर्ण भारतात ग्रीन एनर्जी आहे, त्यावर भर देण्याचे उद्दीष्ट पंतप्रधानांनी ठेवले आहे. 2030 ते 2050 पर्यंत देशात ग्रीन एनर्जी निर्मितीचे सरकारचा विचार आहे, अशी माहिती वीज मंत्री सुदीन ढवळीकर यांनी दिली.
साळगावात भूमिगत वीजवाहिन्यांची कामे प्रगतीपथावर : आमदार केदार नाईक
साळगावचे आमदार केदार नाईक म्हणाले, प्रशासन तुमच्या दारी हा एक लोकांसाठी सरकारचा चांगला प्रयोग आहे. साळगावात 50 टक्के भूमिगत वीज वाहिन्या कामे पूर्ण झाली आहेत. पुढील 3 वर्षांत राज्यात सगळीकडे उच्चदाबाची भूमिगत वीजवाहिनी घालण्यात येईल, अशी माहिती वीजमंत्र्यांनी दिली आहे. आपण सर्वांनी संघटितपणे विकासकामे करण्यास सहकार्य कऊया, असे आमदार केदार नाईक म्हणाले.
सर्वांनी सौर ऊर्जेला प्राधान्य द्यावे : आमदार जोशुआ
म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा यांनी म्हापशात 120 कोटीची कामे पूर्ण झाली, अशी माहिती दिली. भूमिगत वीज वाहिन्या पूर्ण झाल्या. गणेशपुरी म्हापसा येथे नवीन वीज खात्याचे कार्यालय होणार आहे. म्हापशात यापुढे वीज समस्या जाणवणार नाही याकडे प्रामुख्याने लक्ष दिले जाणार. सर्वांनी सौर ऊर्जा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
विविध योजनांचे पैसे देण्यात वेळ काढू नका : आमदार फेरेरा
अधिकारी वर्गाकडून जनतेला सकारात्मक प्रतिसादाची गरज आहे. लोकांना सरकारी कामांसाठी नाही हेलपाटे मारायला लावू नका. गृहआधार, लाडली लक्ष्मी, विधवा योजने लाभ घेताना संबंधिताना बराच त्रास होतो. योजनाचे पैसे वेळेवर येत नाहीत, अशी तक्रार हळदोणचे आमदार अॅड. कार्लुस आल्वारीस फेरेरा यांनी यावेळी केली. शेतबांधांची कामे करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणीही आमदार फेरेरा यांनी केली.
लोकांच्या समस्या जाणून घेणे सरकारचे ध्येय
गेल्यावर्षी मांडलेल्या आर्थिक बजेटापैकी 90 टक्के कामे सरकारने खर्च केली आहेत. यासाठी प्रत्येक खात्याने प्रयत्न केले आहे. सरकार तुमच्या दारी याद्वारे सर्वांच्या घरी जाऊन लोकांच्या समस्या विचारून घ्याव्या हे सरकारचे ध्येय आहे. पण यासाठी एक योग्य निर्णय व्हायला पाहिजे. अशी माहिती विज मंत्री ढवळीकर यांनी दिली. लाडली लक्ष्मी, गृह आधार, विधवा योजनेची कामे लकरच मार्गी लागतील. अटल आस्था 800 अर्ज अद्याप पेंडींग आहेत.
प्रशासन तुमच्या दारी कार्यक्रमाची आगावू माहिती द्या
‘प्रशासन तुमच्या दारी’ हे कार्यक्रम तमाम जनतेसाठी असून असे कार्यक्रम आयोजित करताना त्याची माहिती निदान 15 दिवस अगोदर द्यावी जेणेकरून पंचायत क्षेत्रातील वा पालिका क्षेत्रातील आपल्ल्या समस्या लोक अशा कार्यक्रमात उपस्थित करू शकतात. वा या कार्यक्रमाची माहिती आमदार मंत्री आपापल्या मतदारसंघात देऊ शकतात, अशी मागणी यावेळी उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार कार्लुस आल्वारीस यांनी केली असता मंत्री सुदिन ढवळीकर यांनीही त्याला मान्यता दिली.









