राहुल गांधींचा लोकसभेत मोदी सरकारवर हल्लाबोल : अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी जोरदार गदारोळ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाभारतातील काही दाखले देत सरकारवर जोरदार निशाणा साधला. महाभारत काळात ज्याप्रमाणे अभिमन्यू चक्रव्यूहात अडकला होता, त्याचप्रमाणे आज देशही चक्रव्यूहात अडकला आहे. महाभारतातील चक्रव्यूह 6 लोक नियंत्रित करत होते. आज एकविसाव्या शतकातही असाच चक्रव्यूह देशात निर्माण केला जात असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेतला. यावेळी आपल्या 46 मिनिटांच्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. संसद अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाची तुलना महाभारताच्या चक्रव्यूहाशी केली. हजारो वर्षांपूर्वी कुऊक्षेत्रात अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवून 6 जणांनी मारले होते. आज 21व्या शतकात एक नवे ‘चक्रव्यूह’ निर्माण झाले असून नरेंद्र मोदी, अमित शहा, मोहन भागवत, अजित डोवाल, अदानी आणि अंबानी या 6 जणांच्या माध्यमातून देशाची फसवणूक सुरू असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांच्या या आरोपावरून सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी गदारोळ सुरू केला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना रोखत आरोपांवर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला.
….तेव्हा अर्थमंत्र्यांनी पकडले डोके!
अर्थसंकल्पादरम्यानचा हलवा समारंभाचा फोटो राहुल यांनी सभागृहात दाखवला. यावर लोकसभा अध्यक्षांनी आक्षेप घेतला. हे नियमांच्या विरोधात असल्याचे ते म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, मला फोटो दाखवायचा आहे, त्यात बजेटचा हलवा वाटला जात आहे, पण त्यात एकही ओबीसी, आदिवासी, दलित अधिकारी दिसत नाही. तुम्ही देशाचा हलवा खात आहात आणि इतरांना मिळत नाही, असे वक्तव्य राहुल यांनी केले. देशातील सुमारे 73 टक्के लोक दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय आहेत. या मुख्य शक्ती असूनही त्यांना कुठेही स्थान मिळत नसल्याचा आरोप ऐकून केंद्रीय अर्थमंत्र्यांनी डोक्यावर हात घेतला. तसेच या आरोपानंतरही सभागृहात चांगलाच गदारोळ झाला.
अर्थसंकल्पाबाहेरील मुद्यांना स्पर्श
राहुल गांधींनी अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी होताना अन्य मुद्यांना स्पर्श केल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. शेतकऱ्यांबाबत बोलताना त्यांनी केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करत तीन काळे कायदे असा आरोप केला. शेतकरी तुमच्याकडे एमएसपीची कायदेशीर हमी मागत आहेत. तुम्ही त्यांना सीमेवर थांबवले आहे. शेतकरी मला भेटायला इथे यायचे होते. तुम्ही त्यांना इथे येऊ दिले नाही. त्यावर सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना अडवत सभागृहात चुकीचे बोलू नका, असे सांगितले.
अदानी-अंबानींवरूनही ‘वॉर’
अदानी आणि अंबानी हे दोन लोक भारतातील पायाभूत सुविधा आणि व्यवसायावर नियंत्रण ठेवतात. त्यांच्याकडे विमानतळ आहेत, टेलिकॉम आहेत, आता ते रेल्वे क्षेत्रातही लक्ष घालत आहेत. भारताच्या संपत्तीची मक्तेदारी त्यांच्याकडे आहे. आम्ही त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही असे तुम्ही म्हणत असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आम्हाला बोलायचे आहे, असे राहुल गांधी म्हणाले.









