जुनी पेन्शनमधील सहभागी कोल्हापूर महापालिकेतील कर्मचाऱ्यांची स्थिती : कर्मचारी संघटना अक्रमक भूमिकेत, अतिरिक्त आयुक्तांवर प्रश्नांची सरबत्ती
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांनी मागील महिन्यांत जुनी पेन्शन लागू करण्यासाठी संप पुकारला होता. यामध्ये कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारीही सहभागी झाले होते. महापालिका प्रशासनाने संप कालवधीत गैरहजरी मांडली असून या महिन्यांतील पगार देताना दोन दिवसांचा पगार कपात केला आहे.
यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. मनपा कर्मचारी संघाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांची यासंदर्भात भेट घेतली. संतप्त कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. महाराष्ट्र राज्य महापालिका कर्मचारी फेडरेशनकडे यासंदर्भात आज, बुधवारी पत्र पाठविण्यात येणार आहे. यावेळी अजित तिवले, दिनकर आवळे, सिकंदर सोनुले, महेश ढवळे, मारूती दबडे उपस्थित होते.
तत्कालिन आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी असताना सुट्टी दिवशीही कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेचे काम केले. यावेळी कर्मचारी संघटनेने जादा मेहनताणा मिळावा अशी मागणीही केली नाही. यामुळे मनपाचे राज्यभर नावलैकीक झाले आहे. त्यामुळे संप कालावधीतील पगार कपात करू नये, असे पत्र 17 मार्च रोजी दिले होते. तरीही प्रशासनाने पगार कपात केला आहे, हे चुकीचे आहे.
अजित तिवले, जनरल सेक्रेटरी, मनपा कर्मचारी संघ