मोझेस वॉलफँग मास्कारेन्हस या प्रतिभावंत 22 वर्षीय अॅथलेट्सने आपल्या चपळतेच्या बळावर मैदानी क्रीडामध्ये सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. गोव्याच्या स्पोर्टिंग सर्कलमध्ये ‘वॉलफीट’ या नावाने परिचित असलेला मोझेस हा भविष्यात केवळ गोव्यातच नव्हे, तर राष्ट्रीय स्तरावर आपलं नाव करेल, यात शंका नाही. हल्लीच गोवा विद्यापीठाने आयोजित केलेल्या 37व्या आंतर महाविद्यालयीन पातळीवरील अॅथलेटीक स्पर्धेत मोझेसची कामगिरी पाहिली तर या चौगुले महाविद्यालयातील मास्टर्स ऑफ आर्ट्सचा इंग्लीश विषयातील विद्यार्थ्याला अॅथलेटीक खेळात भविष्य मात्र उज्वल आहे. अॅथलेटीक्स फिल्डमध्ये असलेले प्रशिक्षक तसेच गोवा अॅथलेटीक संघटनेचे पदाधिकारी मोझेस अॅथलेटीक ट्रॅकवर करत असलेल्या कामगिरीची स्तुती करताना थांबत नाहीत. हा खेळ मोझेसने सिरीयस घेतला किंवा त्याला योग्य मार्गदर्शन, प्रगत प्रशिक्षण आणि शासनाचा पाठिंबा मिळाला तर ही ‘गोवन एक्सप्रेस’ एक लंबी रेस का घोडा निश्चितच बनू शकेल.
मोझेसने अॅथलेटीक्स खेळातील आपला दबदबा यंदा दाखविला. बांबोळीतील अॅथलेटीक ट्रॅकवर धावताना त्याने अनेक विक्रमांना गवसणी घातली. चौगुले कॉलेजचे प्रतिनिधीत्व करताना ‘वॉलफिट’ने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत नव्या विक्रमाची नोंद केली व इतिहास घडविला. मोझेसने 100 मीटर स्प्रिंट केवळ 10.69 पूर्ण करून सर्वांना थक्क केले. 200 मीटर स्प्रिंटमध्ये मोझेसने सुवर्णपदक मिळविले आणि विद्यापीठाच्या विक्रमाशी बरोबरी केली. 22.03 वेळेत ही शर्यत पूर्ण करताना आपली वैयक्तिक कामगिरीही वधारली. स्पर्धेत गोवा विद्यापीठाचा उत्कृष्ट अॅथलेट्स हा पुरस्कार स्वीकारताना मिळालेली शाबासकी आणि प्रंचड संख्येने जमलेल्या अॅथलेट्सप्रेमींच्या टाळ्या निश्चितच मोझेसने केलेल्या अफलातून कामगिरीसाठी होत्या.
मोझेसला मैदानी खेळाची आवड बालपणापासूनच. सां जुझे दी आरियल येथील दी किंग्स स्कूलमध्ये सातवीच्या वर्गात शिकत असताना त्याने फातोर्डा आरसीसीत प्रवेश घेतला. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे अॅथलेटीक खेळातील प्रशिक्षक पॅट्रिक सुवारीसने मोझसमध्ये असलेले गुण हेरले व त्यांना पैलू दिला. मागील सहा वर्षे मोझेस आता सुवारीस यांच्या तालमीत आहे. सातवीत असताना मोझेसने अॅथलेट्क्सी खेळातील आपले पहिले पदक 2017-18 मध्ये क्रीडा व युवा व्यवहार खात्याने आयोजित केलेल्या राज्य अॅथलेट्क्सी स्पर्धेत जिंकले. ‘या पदकाने मला मैदानी खेळाकडे वळविले. नियमितपणे पॅट्रीक सरांकडे मी सराव करण्यास सुरूवात केली. एक दिवसही सराव चुकविला तर मला पुष्कळ काही गमविल्यासारखे वाटू लागले, असे मोझेस मास्कारेन्हस म्हणाला. नियमित सराव करून मी माझा या खेळातील आलेख नेहमीच उंचावण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे मोझेस म्हणाला.
माझे प्रशिक्षक पॅट्रिक सुवारीस सरानी मला नेहमीच प्रोत्साहन दिले आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी मला दिलेल्या प्रशिक्षणांमुळे मला खूप मदत झाली आहे. त्यांच्यामुळेच दरवर्षी मी माझ्या वेळेत हळूहळू सुधारणा करून शकलो. प्रशिक्षक माझ्या तंत्रातील लहानात लहान असंतुलनांवर काम करायचे. आम्ही ताकद, आणि कंडिशनिंग, वेग, सहनशक्ती आणि अनेक तांत्रिक बाबींवर बारकाईने काम केले. माझ्या प्रत्येक स्पर्धांपूर्वी, ते फक्त एवढेच म्हणायचे की ‘स्वत:वर लक्ष केंद्रित कर, इतरांवर नाही. सर्वोत्तम प्रयत्न कर, विश्रांती घे. ते नेहमीच मला सांगतात, ‘तुला सुरूवातीच्या रेषेपासून दूर जाण्याऐवजी अंतिम रेषेकडे धावावे लागेल’, आणि मला वाटते की माझ्या शर्यतीपूर्वी मला उत्साहित आणि प्रेरित ठेवण्यासाठी ही त्यांची नेहमीच एक चांगली रणनिती राहिली आहे, असे मोझेस मास्कारेन्हस म्हणाला.
नियमित सराव व शिस्त यामुळेच मोझेस मास्कारेन्हस मैदानी खेळात बहरत आहे, असे गोवा अॅथलेटीक संघटनेचे सचिव आणि माजी क्रीडा शिक्षक शरेंद्र नाईक म्हणाले. मोझेस हा गोवा अॅथलेटीक संघटनेचा आणि प्रामुख्याने आमच्या राज्याची शान आहे. मोझेसला घडविणारे प्रशिक्षक पॅट्रिक सुवारीस हे सुद्धा तेवढेच कौतुकास पात्र आहेत, असे नाईक म्हणाले. प्रशिक्षक सुवारीस यांच्या कुशल मार्गदर्शन आणि प्रशिक्षणाखाली मोझेस आता राष्ट्रीय पातळीवर आपलं कसब दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे. अन्य अॅथलेट्सप्रमाणे मोझेसचेही स्वप्न आहे ते आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे. मोझेसचा टॅक रिकॉर्ड बघितला तर भविष्यात उत्तुंग झेप घेण्याचे त्याचे स्वप्न निश्चित साकार होईल असे वाटते.
अॅथलेट्क्सी स्पर्धेत मोझेस मास्कारेन्हसचा आलेख
- 2019 मध्ये पश्चिम विभाग राष्ट्रीय अॅथलेटीक स्पर्धेतील 4×100 रिलेमध्ये गोव्यासाठी ब्राँझपदक. ज्युनियर राष्ट्रीय आणि राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व.
- 2022 मध्ये क्रीडा खात्याच्या मिनी अॅथलेटीक स्पर्धेत 100 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदक. 61व्या राष्ट्रीय खुल्या अॅथलेटीक स्पर्धेत व अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत सहभाग.
- 2022-23 मध्ये 35व्या गोवा विद्यापीठ अॅथलेटीक स्पर्धेत 100 व 200 मीटर स्प्रिंटमध्ये सुवर्णपदके व स्पर्धेत उत्कृष्ट अॅथलेट्सचा पुरस्कार.
- 2023 मध्ये राज्य अॅथलेट्क्सी स्पर्धेत 100 व 200 मीटर स्प्रिंट्समध्ये सुवर्णपदके व उत्कृष्ट अॅथलेट्चा पुरस्कार. 62व्या आंतर राज्य राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा, राष्ट्रीय खुली अॅथलेटीक स्पर्धा, गोव्यात झालेली राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व राष्ट्रीय झोनल स्पर्धेत गोव्याचे प्रतिनिधीत्व.
- 2023-24 मध्ये 36व्या गोवा विद्यापीठ अॅथलेटीक स्पर्धेत 100 व 200 मीटर स्प्रिंट्समध्ये सुवर्णपदके तर उत्कृष्ट अॅथलेट्सचा पुरस्कार.
- 2024 मध्ये राज्य अॅथलेट्क्सी स्पर्धेत 100 व 200 मीटर स्प्रिंट्समध्ये सुवर्णपदके व उत्कृष्ट अॅथलेट्सचा पुरस्कार, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अॅथलेटीक स्पर्धेत गोवा विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व. उत्तराखंडात झालेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत निवडण्यात आलेला गोव्याचा एकमेव अॅथलेट.
- 2024-25 मध्ये 37व्या गोवा विद्यापीठाच्या अॅथलेटीक स्पर्धेत 100 मीटर स्प्रिंटमध्ये नवा विक्रम, 200 मीटर स्प्रिंटमध्ये स्पर्धा विक्रमाशी बरोबरी व सलग तिसऱ्यांदा उत्कृष्ट अॅथलेटचा बहुमान.
संदीप मो. रेडकर









