सागरी स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांचा पाडला पाऊस, उसळत्या लांटावर स्वार होऊन फास्टेस्ट स्वीमरचाही पटकावला अनेकदा किताब, अनेक राष्ट्रीय विक्रमांची केली नोंद
कोल्हापूर : अमर्याद सागराच्या उसळणाऱ्या लाटा पाहून साहजिकच कोणीही घाबरतोच. बीचच्या कडेला पोहणाऱ्यांनाही लाटांचा अंदाज घेऊनच समुदात उतरावे लागते. जाळ आणि पाण्यासोबत चेष्टा मस्करी चालत नाही असे म्हणतात. कारण धोका हा ठरलेला असतो. अशा धोक्याच्या आव्हानात मोठ्या हिंमतीने जलतरण करत राष्ट्रीय सागरी जलतरणपटू म्हणून नाव कमवण्याचा पराक्रम कोल्हापूरी जलतरणपटू निकिता प्रभूने केला आहे. तिने क्षणाक्षणाला उसळत राहणाऱ्या मोठ्या लाटावरच स्वार होत अनेक सागरी 3, 5, 6, 10, 30 व 81 किलो मीटर जलतरण स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक जिंकण्याची किमया केली आहे. अनेक स्पर्धेत ‘फास्टेस्ट स्वीमर‘ हा किताबही मिळवला आहे. इतकेच नव्हे तिने विविध सागरी स्पर्धेत नियोजित आंतर कमी वेळेत गाठून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केले आहेत. सध्या निकिता जलतरण तलाव, सागरातील पोहण्याच्या अनुभवाच्या जोरावर बेंगळुरमध्ये बसवंत गुडी अॅक्टेटीक सेंटरमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. जागतिक महिलादिनाच्या पुर्वसंध्येचे औचित्य साधून निकीताच्या कामगिरीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप.
निकिताचे वडील शैलेश प्रभू व आई स्वाती हे मुळचे मुंबईचे. नोकरीच्या निमित्ताने ते कोल्हापूरातच स्थायिक झाले. निकिताने 1998 साली त्यांच्या पोटी जन्म घेतला. निकिताही इतर कुटुंबातील मुलींप्रमाणे आपल्या कुटुंबात वाढत होती. भविष्यात ती सागरी जलतरण स्पर्धेतील सुवर्णकन्या बनेल याची पुसटशीही कल्पना आई-वडीलांना नव्हती. निकीताचे मामा प्रसन्न आचार्य हे तिला पहिले मार्गदाते गुरु म्हणून लाभले. त्यांनी निकीताला जलतरणपटू बनवण्यासाठी पुढाकार घेतला. रेसिडेन्सी क्लबमधील जलतरण तलावात विजय मांगलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिने जलतरणाचा सराव सुरू केला. लहान वयातच मांगलेकर यांनी तिच्याकडून फ्रीस्टाईल, बटरफ्लाय, बॅकस्ट्रोक, ब्रेस्टस्ट्रोक या जलतरणातील चारही प्रकारांचा सराव करवून घेतला. यावेळी ती होलीक्रास हायस्कूलमध्ये शिकत होती. तिने सरावाच्या जोरावर 2003 साली रोटरी क्लबतर्फे इचलकरंजीमध्ये आयोजित केलेल्या जलतरण स्पर्धेत 50 मीटर फ्रीस्टाईल या प्रकारात पहिला क्रमांक मिळवला. चौथीसाठी निकिताला छत्रपती शाहू विद्यालयात घातले. सारे शहर पहाटेच्या साखर झोपेत असताना आई स्वाती या निकिताला भवानी जलतरण तलावात सरावासाठी नेऊ लागल्या. जलतरणातील महागुरु ओळखले जाणारे प्रशिक्षक श्रीकांत जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली ती जलतरणाचे धडे घेऊ लागली.
शालेय 14 वर्षाखालील मुलींच्या जलतरण स्पर्धेत ती प्रतिनिधित्व करू लागली. राज्यस्तरीय स्कूलगेम्सअंतर्गत झालेल्या जलतरण स्पर्धेतील 800 मीटर फ्रिस्टाईलमध्ये रौप्य व 400 मीटर फ्रिस्टाईलमध्ये कांस्य पदक तिने पटकावले. यानंतर जलतरण तलावातील स्पर्धेवरील लक्ष कमी करुन तिने सागरी जलतरणावर अधिकचे लक्ष पेंद्रीत केले. निकिताने उमेदीच्या काळातील शाळा, महाविद्यालय व विद्यापीठ पातळीवरील जलतरण स्पर्धेत विद्यालय, कॉलेज व शिवाजी विद्यापीठ संघातून प्रतिनिधीत्व करत पदके जिंकली आहेत. परंतू तिने सागरी जलतरणात मिळवलेल्या यशाला तोड नाही, हे आजचे वास्तव आहे. मुळात सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी व्हायचे म्हणजे काही चेष्टेचा विषय नाही. सागरातील उसळत्या लाटा भेदत लांब पल्ल्याचे लक्ष्य गाठण्यासाठी जलतरणपटूंच्या दोन्ही बाहूत हत्तीच्या बळासारखी ताकत असावी लागणारे हे उघड आहे. ही ताकत कमवण्यासाठी निकिताला अधिक कठोर परिश्रम घ्यावे लागणार याची जाणिव वडील शैलेश यांना होती. त्यामुळे त्यांनीच तिच्या सरावाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी प्रशिक्षकांकडून घेतलेल्या माहितीनुसार निकिताकडून कोल्हापुरातील ताराबाई पार्क ते शाहू नका ते शिवाजी विद्यापीठातील रस्ते अशा मार्गावरुन धावण्याचा सराव करवून घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर भवानी जलतरण तलाव व राजाराम तलाव या दोन्हीही ठिकाणी जास्तीत वेळ पोहण्याचाही सराव सुऊ ठेवला. या सरावामुळे तिच्या दोन्ही बाहूत हत्तीचे बळ आले. या बळानेच तिच्यात मिनिटा मिनिटाला समुद्रातील लांबचे आंतर गाठण्याची क्षमताही निर्माण झाली. प्रशिक्षक बालाजी केंद्रे यांनी दिलेल्या टिप्सनुसार आई स्वाती ह्या खुराक बनवून निकिताला देऊ लागल्या.
2011 साली निकिताने मालवण येथे महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटीक असोसिएशन आयोजित सागरी 5 किलो मीटर जलतरण स्पर्धेच्या निमित्ताने सागरात उडी घेतली. ही उडी साधीसुधी नव्हती तर सुवर्ण पदकाला गवसणी घालणारी होती. आपल्या-पहिल्या स्पर्धेत रस्त्यावर धावण्याचा आणि राजाराम तलावात पोहण्याचा केलेला सराव पणाला लावत निकिताने पहिले सुवर्ण पदक जिंकले. या पदकी कामगिरीमुळे आत्मविश्वास ऊंदावलेल्या निकिताने 2015 पर्यंत आयोजित होत राहिलेल्या 5 किलो मीटर सागरी जलतरण स्पर्धेवर हुकूमत गाजवत सुवर्ण पदक जिंकण्याची किमया केली. याच दरम्यान म्हणजे 2012 ते 17 या कालावधीतही अखिल भारतीय इंडियन नेव्ही 6 किलो मीटर सागरी जलतरण स्पर्धेतही निकिताने आपलाच डंका पिटत सुवर्ण पदकांना गवसणी घालत फास्टेस्ट स्वीमरचाही किताब पटकावला. 2012 ते 2016 या कालावधीत आयोजित केलेल्या ऑल इंडिया संकरॉक नाईट हाऊस ते गेट-वे ऑफ इंडिया 5 किलो मीटर स्पर्धेतही निकिताने सुवर्ण पदक जिंकत आपला दबदबा घट्ट केला.
2015 साली स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 10 किलोमीटर सागरी जलतरण स्पर्धेत ताकतवर महिला जलतरणपटूंना मागे टाकत सुवर्ण पदक जिंकताना फास्टेस्ट स्वीमरचाही किताब निकिताने जिंकला. या कामगिरीमुळे तिली रशियातील वर्ल्डचॅम्पियनमध्ये प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. 2016 सालच्या स्पर्धेतही तिने रौप्य तर 2019 व 2022 सालच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून पदके जिंकून आपल्यातील ताकत पुन्हा सिद्ध केली. 2016 ते 18 या कालावधीत पोरबंदर (गुजरात) येथेही स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या 10 किलो मीटर सागरी जलतरण स्पर्धेत रौप्य तर 2 व 5 किलोमीटर स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावत कन्सीटन्सी परफॉमेन्सची झलकही दाखवून दिली.
राष्ट्रीय विक्रम आजही आबाधीत…
मालवण, मुंबई, गोवा, पोरबंदर (गुजरात) येथे आयोजित 5 व 10 सागरी जलतरण स्पर्धेत कमी वेळेत आंतर गाठून निकिताने राष्ट्रीय विक्रमांची नोंद केली आहे. 2013 साली महाराष्ट्र स्टेट अॅमॅच्युअर अॅक्वेटीक असोसिएशन आयोजित सागरी जलतरण स्पर्धेत निकिताने 16 ते 18 वर्षाखालील मुलींच्या गटात 5 किलो मीटरतचे आंतर 35 मिनिट 46 सेकंदात गाठून सुवर्ण पदक जिंकतानाच राष्ट्रीय विक्रमाची नेंद केली. हा विक्रम आजतागायत आबाधित आहे. 2012 साली इंडियन नेव्हीच्या वतीने आयोजित केलेल्या ‘मुंबई नेव्हल डॉक सागरी जलतरण स्पर्धेत 6 किलोमीटर जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी 6 किलो मीटरचे आंतर मुंबईच्या सिंजीनी सहाय हिने 1 तास 8 मिनिटात गाठवून विक्रम केला होता. हा विक्रम मोडत निकिताने 39 मिनिटे 35 सेकंदातच सहा किलो मीटरचे आंतर गाठत विक्रम केला आहे.
प्रशिक्षणातील विविध कोर्समध्ये निकिताची कौतुकास्पद कामगिरी…
अमेरिकन स्वीमिंग कोच असोसिएशन (अस्का) आयोजित लेव्हल वन तू फाईव्ह लायसन्स कोर्स करून त्यात यशस्वी झालेली निकिता पहिली भारतीय महिला ठरली आहे. हा कोर्स केल्याने तिला जगातील कोणत्याही राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहता येणार आहे. ओडिशा नॅशनल इंडीयन ऑफ स्पोर्टस्चाही (एनआयएस) तिने 6 आठवड्यांच्या सर्टिफिकेशन कोर्स इन स्वीमिंग कोचिंगचा कोर्स पूर्ण करत सुवर्ण पदक जिंकले आहे. स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित लेव्हल-1 व 2 आणि ऑस्ट्रेलियातील स्वीमिंग लेव्हल-1 चाही स्वीमर क्रियेशन कोर्स पूर्ण केला आहे. सध्या निकिता ही बेंगळूरमधील बसवंत गुडी अॅक्वेटीक सेंटरमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तिच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या अनेक जलतरणपटूंनी सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके जिंकण्याची किमयीही केली आहे.
आपल्या आगामी कामगिरीबद्दल बोलताना 27 वर्षीय निकिता म्हणाली, कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे 2014 साली स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित सागरी 81 किलो मीटर जलतरण स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्याचा माझ्याकडे मोठा अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर आता 32 किलो आंतराची आव्हानात्मक इंग्लिश खाडीसह 40 किलो आंतराची इंडिया टू श्रीलंका मोहिम हाती घेणार आहे. इंटरनॅशनल सागरी जलतरण स्पर्धेतही प्रतिनिधीत्व करण्याचे लक्ष्य आहे.









