तिरंदाजीत भारताला पहिले सुवर्ण : मिश्र सांघिक प्रकारात मिळवले यश : बॉक्सिंगमध्ये 1 रौप्य व 1 कांस्यपदक
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
चीनमध्ये सुरु असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या ज्योती वेणम आणि ओजस देवतळे यांच्या मिश्र संघाने कंपाऊंड तिरंदाजीत सुवर्णपदक पटकावले आहे. ज्योती आणि ओजस देवतळे यांनी कंपाऊंड मिश्र सांघिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोरियन जोडीचा 159-158 असा पराभव केला. या कामगिरीसह भारताने जकार्ता येथे 70 पदके जिंकण्याचा विक्रम मागे टाकला आहे. आशियाई क्रीडा 2023 स्पर्धेत भारताने मिळवलेले आतापर्यंतचे हे 71 वे पदक आहे. 2018 मध्ये जकार्ता येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने एकूण 70 पदके जिंकली होती. या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले आहे.
पहिल्या फेरीत भारतीय तिरंदाजांनी दोन्ही प्रयत्नांत प्रत्येकी 10 गुण मिळवले. म्हणजेच भारताला एकूण पूर्ण 40 गुण मिळाले. त्याचवेळी दक्षिण कोरियाच्या तिरंदाजांनी पहिल्या प्रयत्नात 9 गुण मिळवले. पहिल्या फेरीनंतर स्कोअर 40-39 असा भारताच्या बाजूने होता. यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये कोरियन जोडीने प्रथम प्रयत्न केला आणि चारही बाण अचूक मारून 40 गुण मिळवले. भारतीय तिरंदाजांनीही कोणतीही चूक केली नाही आणि पूर्ण 40 गुण मिळवले. दुसऱ्या फेरीनंतरही भारतीय संघ 80-79 असा आघाडीवर राहिला. तिसऱ्या फेरीत कोरियन तिरंदाजांनी दबावाखाली चांगली कामगिरी केली आणि पूर्ण 40 गुण मिळवले. भारतासाठी ओजसने एका प्रयत्नात 9 गुण मिळवले आणि भारताची आघाडी संपुष्टात आली. तिसरी फेरी संपल्यानंतर दोन्ही संघ 119-119 अशा बरोबरीत राहिले. चौथ्या व निर्णायक फेरीत मात्र भारतीय संघाने प्रथम प्रयत्न केला आणि दोन्ही तिरंदाजांनी 10 गुण मिळवले. त्याचवेळी कोरियाच्या जूला केवळ 9 गुण मिळवता आले. भारताकडे एका गुणाची आघाडी होती. चारही तिरंदाजांनी शेवटच्या प्रयत्नात 10 गुण मिळवले. मात्र, जूच्या चुकीमुळे अखेरीस भारतीय संघ 159-158 असा आघाडीवर राहिला आणि सुवर्णपदक जिंकले. कोरियन संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कझाकस्तानला कांस्यपदक मिळाले.
बॉक्सिंगमध्ये लोवलिनाला रौप्य
भारताची ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर लोवलिना बोरगोहेनने महिला बॉक्सिंग 75 किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. सुवर्णपदकाच्या सामन्यात चीनच्या ली कियानने तिचा 5-0 असा पराभव केला. यामुळे लोवलिनाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, ऑलिम्पिक पदक विजेती आणि जागतिक विजेती लोवलिना तिच्या श्रेणीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन पॅरिस 2024 ऑलिम्पिक कोटा मिळवला होता. अंतिम फेरीत तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती मात्र चीनच्या दिग्गज कियानपुढे तिचा निभाव लागला नाही.
57 किलो गटात परवीन हुडाला कांस्य
दरम्यान, बॉक्सिंगमध्ये भारताची स्टार बॉक्सर परवीन हुडाने 57 किलो गटात कांस्यपदकाला गवसणी घातली. उपांत्य लढतीत तिला चिनी तैपेईच्या विश्व चॅम्पियन लिन यू टिंगकडून 5-0 असा एकतर्फी पराभव स्वीकारावा लागला. उंचीने तगड्या असलेल्या तैपेईच्या लिनने परविनविरुद्ध आक्रमक खेळ केला. याचा तिला फायदा झाला. दरम्यान, 57 किलो गटात उपांत्य फेरी गाठत परवीनने याआधीच पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे.
दरम्यान, आशियाई स्पर्धेत बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील भारताचे इव्हेंट समाप्त झाले. यंदाच्या स्पर्धेत भारताने बॉक्सिंगमध्ये एका रौप्यपदकासह चार कांस्यपदकाची कमाई केली.









