भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, सर्व समाजांच्या संपर्कात राहण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचा सुवर्णकाळ आता नजीक आला आहे. भारतीय जनता पक्ष हा भारताच्या जनतेचे आशास्थान असून लोकांचा अधिकाधिक विश्वास मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रत्येक समाजघटकाच्या संपर्कात रहावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसमोर केलेल्या भाषणात केले. या बैठकीला देशभरातून 350 हून अधिक पदाधिकारी उपस्थित आहेत. बैठकीसमोर पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांचेही भाषण झाले.
आपल्याला सर्वांना एकत्र आणायचे आहे. कार्यकर्त्यांनी हिंदूंबरोबरच अल्पसंख्य समुदायाच्या लोकांशीही जोडून घ्यायचे आहे. शीख, बोहरा, पासमंद आदी अल्पंख्याकांनाही भाजपशी जोडणे आवश्यक आहे. भाजपचा राष्ट्रहिताचा आणि प्रगतीचा संदेश सर्वांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. गेल्या आठ वर्षांमध्ये आपल्या सरकारने देशाच्या आर्थिक विकासासाठी अनेक निर्णायक पावले उचलली आहेत. आपल्या निर्णयांचे परिणाम आता दिसून येऊ लागले आहेत. भारताला आता मोठी उर्जितावस्था प्राप्त होत असून लोकहिताच्या निर्णयांची आणि त्यांच्या परिणामांची माहिती सर्वदूर आणि सर्व समाजघटकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य आपण करायचे आहे. यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
एक भारत, श्रेष्ठ भारत
भारताला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर एकात्मता निर्माण होणे आवश्यक आहे. देशात युवकांची संख्या मोठी आहे. त्यांना भारताची योग्य त्या प्रकारे ओळख करुन द्यावी लागणार आहे. आज जे 18 ते 25 या वयोगटातील आहेत, त्यांना पूर्वीच्या सरकारांमध्ये कसा भ्रष्टाचार माजला होता, याची माहिती नाही. कारण त्यांनी ती सरकारे अनुभवलेलीच नाहीत. त्यांना त्यासंबंधीची माहिती देणे आवश्यक आहे. त्यानंतरच त्यांना विद्यमान सरकार आणि पूर्वीची सरकारे यांच्या कार्यपद्धतीतील अंतर समजणार आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
विकासासाठी योगदान द्या
भाजपच्या कार्यकर्त्यांनी देशाच्या प्रगतीत आपले भरीव योगदान द्यावे. प्रत्येक खेडय़ांमध्ये भाजपच्या वतीने जनसंपर्क अभियानाचा प्रारंभ झाला पाहिजे. केंद्र सरकारच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि योजनेत भाजप कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा. देशाच्या विकासाची फळे सर्वांपर्यंत पोहचविण्याचा यशस्वी प्रयत्न सरकारने केला आहे. कार्यकर्त्यांनी सरकारच्या हितकारक योजनांची माहिती लोकांना देऊन त्यांना या योजनांचे लाभ घेण्यास उद्युक्त करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
अमृतकाल ते कर्तव्यकाल
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बैठकीसमोर भाषण केले. नुकताच आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. आता या अमृतकालाचे रुपांतर ‘कर्तव्यकाला’त झाले पाहिजे. कार्यकर्त्यांनी याच भावनेने कार्य करावे. कार्यकर्त्यांचे बळ हे भाजपचे मर्मस्थान आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
लोकसभा निवणुकीचे रणशिंग ?
राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाषण करताना पंतप्रधान मोदी यांनी जणू 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंगच फुंकले आहे, अशी राजकीय अभ्यासकांची धारणा आहे. ज्या शब्दांमध्ये आणि ज्या उत्साहात नेत्यांनी या बैठकीत संबोधित केले, त्यावरुन असेच दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे.
इतर नेत्यांचीही भाषणे
या बैठकीत भारतीय जनता पक्षाच्या इतर मान्यवर नेत्यांनीही कार्यकर्त्यांना अनेक सूचना केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त करतानाच कार्यकर्त्यांनी आतापासूनच त्या दिशेने कामाला प्रारंम करावा, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना पेले आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांनीही बैठकीसमोर भाषणे केली.
सज्जतेचा आदेश ?
ड राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत भाजपकडून लोकसभा निवडणुकीची तयारी ?
ड समाजाच्या प्रत्येक घटकाशी कार्यकर्त्यांनी जोडून घेण्याचे शहांचे आवाहन
ड 18 ते 25 वयोगटातील युवकांना देशाचा खरा इतिहास सांगणे आवश्यक
ड भाजपचे 350 हून अधिक पदाधिकारी कार्यकारिणी बैठकीला उपस्थित









