कारवार : रस्त्यावरून निघालेल्या वृद्धेचे लक्ष अन्यत्र वेधून मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी वृद्धेच्या हातातील लाखो रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या लांबविल्याची घटना शुक्रवारी दांडेली येथील हेडपोस्ट ऑफीससमोरच्या चर्च रस्त्यावर घडली आहे. वृद्ध महिलेचे नाव शांती यल्लाप्पा पवार (वय 85, रा. ओल्ड डी. आर. टी. कॉलनी, बांगुरनगर, दांडेली) असे आहे. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, शांती यल्लाप्पा पवार ही वृद्धा वैयक्तिक कामासाठी चर्च रस्त्यावरुन निघालेली असताना मोटारसायकलवरुन दोन अज्ञात व्यक्ती तेथे दाखल झाल्या.
त्यानंतर त्या दोघांनी पवार यांचे लक्ष अन्यत्र वेधले आणि त्यांच्या हातातील 40 ग्रॅम सोन्याच्या बांगड्या लांबविल्या. लांबविण्यात आलेल्या बांगड्यांची किंमत 2 लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. वृद्धेच्या हातातील बांगड्या लांबविलेल्या त्या दोन अज्ञातांची छबी सी.सी.टी.व्ही.मध्ये कैद झाली आहे. या प्रकरणाची नोंद दांडेली नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस त्या अज्ञाताना ताब्यात घेण्याच्या प्रयत्नात आहेत. दरम्यान, पोलीस खात्याकडून ज्येष्ठ नागरिकांना विशेष करून महिलांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अलिकडच्या काळात चेन स्नॅचींगच्या प्रकरणामध्ये वाढ झाली आहे. त्याकरीता दागिने घालून वावरणाऱ्या महिलांनी जागृत राहण्याचे आवाहन पोलीस खात्याकडून करण्यात आले आहे.









