योगऋषी स्वामी रामदेवबाबा यांचे प्रतिपादन : मिरामार येथे आजपासून तीन दिवस योग शिबीर
पणजी : योगातून रोग आणि व्यसनमुक्ती हेच आमचे प्रथम ध्येय असून त्याच दृष्टीने दक्षिण भारतात पतंजलीचे सर्वात मोठे वेलनेस योगकेंद्र गोव्यात स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणाला अनुकूल असे गुरूकुलही गोव्यात स्थापन करण्याची योजना आहे, अशी माहिती योगऋषी रामदेवबाबा यांनी दिली. महाशिवरात्रीच्या अध्यात्मिक पावन पर्वावर आज दि. 18 पासून मिरामार येथे होणाऱ्या तीन दिवशीय योग शिबिरासंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. व्यासपीठावर त्यांच्यासमवेत स्वामी परमार्थ देवजी, पतंजली योगपीठाचे कमलेश बांदेकर, राष्ट्रीय महिला संघटनेच्या प्रमुख साध्वी डॉ. देवप्रिया आणि भारतीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एन. पी. सिंग यांची उपस्थिती होती.
सनातन म्हणजे सर्व धर्मांचा संगम
योग, आयुर्वेद आणि सनातन जीवनमूल्यांवर आधारित असे हे योग शिबीर आहे. सनातनमध्ये जीवनाच्या सर्व शाश्वत मूल्यांचा समावेश होतो. सनातन म्हणजे हिंदू, जैन, बौद्ध, शिख आदी सर्व धर्मांचा संगम. त्याशिवाय सनातनमध्ये इस्लाम आणि इसाई धर्माच्याही मूलमूल्यांचा समावेश आहे. म्हणूनच सनातन हा एक निर्विवाद शब्द आहे. त्यात कोणतेही धार्मिक धोरण नाही, असे ते म्हणाले.
आमच्या डीएनएमध्ये ’रोग’ नव्हे, ’योग’
या शिबिराच्या माध्यमातून रक्तदाब, मधुमेह, गलगंड, अस्थमा, अस्थिरोग आदी आजारांवरील औषधांपासून ऊग्णांना मुक्ती देणे यादृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. गत 50 वर्षांपासून मी स्वत: योगी जीवन जगत असून सुमारे 35 वर्षांपासून लोकांना योग शिकवित आहे. त्यातून आमच्या डीएनएमध्ये ’रोग’ नव्हे तर ’योग’ असल्याचे सिद्ध झाले आहे. गत 50 वर्षांपासून बदलत्या जीवनशैलीमुळे आम्ही अनुभवत असलेले दूषित खान-पान आणि वातावरण, नैसर्गिक बदल, काही लोकांच्या चुकांमुळे पर्यावरणाची झालेली हानी आदी कारणांमुळे माणसे आजारी पडत असल्याचे दिसून आले आहे, असे रामदेवबाबा म्हणाले.
प्रत्येक व्यक्ती औषधांविना जगू शकते
अशावेळी योगामुळे प्रत्येक व्यक्ती औषधांविना जगू शकतो हे आम्ही सिद्ध केले आहे. मी स्वत: कोणतेही औषध घेत नाही. त्यामुळे आज 55 वर्षांच्या वयातसुद्धा माझे जैविक वय केवळ 25 ते 30 वर्षे या दरम्यान आहे. अशा प्रत्येक व्यक्ती कोणताही वैद्य वा औषधाविना कायम तऊण आणि निरोगी राहू शकते, असे ते म्हणाले. आम्ही आधी लोकांना रोगमुक्त व नंतर औषधमुक्त करणार आहोत. कितीही गंभीर आजार असला तरीही योगाद्वारे तो बरा करता येतो हे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे, असा दावा रामदेवबाबा यांनी केला.









