पोलीस आयुक्तांनी सहकार्याबद्दल केला सत्कार
बेळगाव : सुकामेव्याच्या दुकानातील कर्मचाऱ्यांचे लक्ष विचलित करून गल्ल्यातील 50 हजार रुपये पळविणाऱ्या इराणी नागरिकांना अटक करण्यासाठी दोघा ऑटोरिक्षा चालकांनी दिलेली माहिती महत्त्वाची ठरली आहे. बुधवारी पोलीस आयुक्तांनी या दोन्ही रिक्षाचालकांचा रोख बक्षीस देऊन गौरव केला आहे. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांच्या उपस्थितीत रिक्षाचालक जिलानी बशीरअहमद किल्लेदार, दीपक परशुराम चव्हाण यांचा रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्तांनी या दोन्ही रिक्षाचालकांचे कौतुक केले.
शुक्रवार दि. 20 ऑक्टोबर रोजी देशपांडे गल्ली येथील शगुन ट्रेडर्स या सुकामेव्याच्या दुकानात दोन महिला व एक युवक शिरले होते. खरेदीच्या बहाण्याने आलेल्या या त्रिकुटाने कामगार तरुणीचे लक्ष विचलित करून थेट गल्ल्यातील 50 हजार रुपये पळविले होते. त्याचदिवशी रात्री खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी या टोळीचा शोध सुरू केला होता. ज्या ऑटोरिक्षातून दोघेजण निघून गेले, त्या ऑटोरिक्षाचा शोध घेऊन चालकाची चौकशी करण्यात आली. इराणी नागरिकांनी एकूण दोन रिक्षा वापरल्याचे उघडकीस आले. त्यामुळे दोन्ही रिक्षाचालकांना बोलावून चौकशी करण्यात आली. चौकशीवेळी त्यांनी दिलेली माहिती कारवाईसाठी महत्त्वाची ठरली.









