खासदार डॉ. कोल्हे यांनी ‘तरूण भारत संवाद’ला दिली सदिच्छा भेट
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा गौरवशाली इतिहास आजच्या नव्या पिढीपुढे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. महानाट्याच्या रूपाने हे शिवधनुष्य पेलत असल्याची आम्हाला जाणीव आहे. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेप्रमाणेच शिवपुत्र संभाजी हे महानाट्या तमाम मराठी मनाला ऊर्जा देणारे ठरेल याबद्दल विश्वास आहेच पण राष्ट्र उभारणीच्या कार्यातही या महानाट्याची प्रेरणा तमाम भारतीयांना मिळेल, अशा शब्दात अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भावना मांडल्या.
शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे प्रयोग येथील तपोवन मैदानावर 7 ते 12 एप्रिल या कालावधीत दररोज सायंकाळी 6 वाजता होणार आहेत. महेंद्र महाडिक यांनी या महानाट्याचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. आजवर या महानाट्याचे महाराष्ट्रातील विविध गावात, शहरात, महानगरात प्रयोग झाले आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि गोव्यातही या महानाट्याला उदंड प्रतिसाद लाभला आहे. कोल्हापुरात प्रयोगांसाठी डॉ. कोल्हे कोल्हापुरात आले आहेत. या दरम्यान, मंगळवारी त्यांनी तरुण भारत संवादच्या दसरा चौकातील कार्यालयात भेट दिली.
तरुण भारतचे संस्थापक बाबुराव ठाकुर यांच्या प्रतिमेला अभिवादन केल्यानंतर ‘तरूण भारत संवाद’चे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी झालेल्या संवादात डॉ. कोल्हे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी मालिका आणि शिवपुत्र संभाजी महानाट्या यांच्या निर्मितीचा प्रवास, त्यातून मिळलेली ऊर्जा याविषयी मनोगत मांडले. यावेळी ‘निवासी संपादक मनोज साळुंखे, मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे, जाहिरात व्यवस्थापक (शहर) मंगेश जाधव, प्रशासन अधिकारी राहुल शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. कोल्हे यांनी मनमोकळेपणाने उत्तरेही दिली.
डॉ. कोल्हे म्हणाले, स्वराज्य रक्षक संभाजी या दूरचित्रवाहिनीवरील मालिकेने छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा गौरवशाली इतिहास महाराष्ट्रातील घराघरात पोहचला. या मालिकेला प्रचंड प्रतिसाद लाभला. संभाजी महाराजांचे शौर्य नव्या पिढीपर्यंत नेण्यास मिळाले, हेच भाग्य आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज यांचे शौर्य नव्या पिढीच्या समोर नेण्याचा संकल्प सोडला आहे. तो पूर्णही होतो आहे. आजवर महाराष्ट्र असो, कर्नाटक असो गोवा असो या ठिकाण झालेल्या प्रयोगांना उदंड असा प्रतिसाद लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य, कर्तृत्व आणि शौर्या यातून राष्ट्रनिर्मिती शक्य आहे. शिवपुत्र संभाजी हे महानाट्या यासाठी प्रेरणा, ऊर्जा देणारे ठरेल, असा विश्वास डॉ. कोल्हे व्यक्त केला.
असे आहे….शिवपुत्र संभाजी महानाट्य
200 हून कलाकारांचा संच, घोड्यांचा ताफा, छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा इतिहास याची देही याची डोळा पाहण्याची संधी, महानाट्यात कलाकार : ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतीलच प्राजक्ता गायकवाड, गिरीष ओक, महेश कोकाटे, अजय तपकिरे, रमेश रोकडे, विश्वजित फडते हे कलाकार मुख्य भूमिका साकारत आहेत.
कवड्याच्या माळेला नमस्कार..अन्
छत्रपती शिवाजी महाराज असोत वा छत्रपती संभाजी महाराज असोत, त्यांच्या पायाच्या नखाची सर आपल्या कुणालाही नाही. भूमिका साकारताना महाराजांचा पोषाख परिधान करण्याआधी कवड्याच्या माळेला नमस्कार केल्याशिवाय ती गळ्यात घालत नाही, असे डॉ. अमोल कोल्हे यांनी एका प्रश्नाच्या उत्तर देताना सांगितले.
मी अभ्यासलेला इतिहास प्रेक्षकांपुढे आणतो
मी अभ्यासलेला इतिहास मालिका असो वा महानाट्या असो त्यातून प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. त्यामध्ये स्वराज्याविषयी स्वाभिमान जागवण्याचा छोटासा प्रयत्न असतो, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.