बेळगाव : कधी वेणुग्राम म्हणून ओळखले जाणारे, निसर्गरम्य व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असे हे शहर आज ‘बेळगाव’ या नावाने संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकात प्रसिद्ध आहे. ‘वेणू’ म्हणजे बांबू. या परिसरात पूर्वी प्रचंड प्रमाणात बांबूची झाडं होती. याच बांबूपासून ‘वेणुग्राम’ हे नाव उदयास आलं आणि कालांतराने ‘वेणू’चं रुपांतर ‘बेळ’मध्ये झालं. परिणामी, आजचे ‘बेळगाव’ अस्तित्वात आले. शहराच्या जडणघडणीत येथे निर्माण झालेल्या विविध गल्ल्यांचा मोलाचा वाटा आहे. या गल्ल्यांनी केवळ वस्तीचा विकास केला नाही तर सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचं जतनही केलं आहे. अशाच बेळगावच्या प्रमुख गल्ल्यांची ओळख करून देणारी “माझं वेणुग्राम” ही विशेष मालिका ‘तरुण भारत’च्या माध्यमातून सुरू करण्यात आली आहे. या मालिकेतील पहिलं पर्व ‘चव्हाट गल्ली’ या ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण गल्लीस समर्पित आहे.
चव्हाट गल्ली- मराठी अस्मितेचा बुलंद आवाज
बेळगाव उत्तर विधानसभा क्षेत्रातील सध्याच्या वॉर्ड क्र. 8 मध्ये येणारी चव्हाट गल्ली, जुना धारवाड रोडपासून कोर्ट कंपाऊंडपर्यंत पसरलेली आहे. सुमारे दहा हजार लोकसंख्येच्या या गल्लीत मराठी भाषिकांचा प्रभाव लक्षणीय आहे. ‘चव्हाट गल्ली’चे नाव चव्हाटा देवस्थानामुळे रुढ झाले. या देवस्थानाच्या आधारे गल्लीची ओळख निर्माण झाली आणि तेथील स्थानिक जीवनशैली व संस्कृती याचं केंद्रबिंदू ठरलं.
इतिहास जिवंत करणारी ठिकाणं
गल्लीतील अनेक महत्त्वाची स्थळं आजही इतिहासाची साक्ष देत उभी आहेत. यामध्ये क्रांतीसिंह नाना पाटील चौक, जोतिबा मंदिर, जालगार मारुती मंदिर, शिवनेरी व नरवीर व्यायामशाळा यांचा समावेश आहे. या स्थळांबाबत अधिक माहिती प्रख्यात वकील अमर यळ्ळूरकर आणि मुख्याध्यापक विश्वजित हसबे यांनी दिली आहे. जी आपल्याला ‘तरुण भारत’च्या “माझं वेणुग्राम” या व्हिडिओमधून ऐकायला मिळणार आहे. विशेष म्हणजे या गल्लीतच क्रांतीसिंह नाना पाटील यांनी घेतलेली सभा ऐतिहासिक ठरली होती. त्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेला स्मृतीस्तंभ आज नाना पाटील चौक म्हणून ओळखला जातो.
परंपरा आणि श्रद्धेचा संगम- जोतिबा मंदिर
गल्लीतील ज्येष्ठ नागरिक विश्वास धुराजी यांनी माहिती दिली की, चैत्र पौर्णिमेला कोल्हापूरच्या जोतिबा यात्रेसाठी निघणाऱ्या सासनकाठीचा प्रथम मान चव्हाट गल्लीला दिला जातो. या गल्लीतून निघणारी काठी मंदिरात पोहोचल्याशिवाय इतर कोणतीही काठी मंदिर परिसरात प्रवेश करत नाही. ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जाते.
गल्लीतील पंच-सामूहिक निर्णय प्रणालीचं उदाहरण
या गल्लीत कोणताही सामाजिक निर्णय पंचमंडळींच्या संमतीशिवाय घेतला जात नाही. पूर्वी या गल्लीतील प्रमुख सात पंच महत्त्वाचे निर्णय घेत असत. आजही ही परंपरा टिकून असून, तरुणपिढी वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घेते, ही बाब सामाजिक ऐक्याचे उत्तम उदाहरण आहे.
शारीरिक व सामाजिक विकासासाठी व्यायामशाळा
येथील जुनी शिवनेरी व्यायामशाळा ही परंपरेचा वारसा आहे. तर नवीन ‘नरवीर व्यायामशाळा’ ही तरुणाईसाठी सुसज्ज सुविधा पुरवते. यामुळे चव्हाट गल्ली केवळ सांस्कृतिकच नव्हे तर सुदृढ शरीरयष्टी निर्माण करण्यासाठीही महत्त्वाच्ााr ठरली आहे.
“माझं वेणुग्राम” मालिका- सांस्कृतिक वारशाचा दस्तऐवज
‘तरुण भारत’च्या या विशेष डिजिटल मालिकेमार्फत अशा अनेक गल्ल्यांची माहिती दर माहिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी ‘तरुण भारत’च्या युट्यूब चॅनेलवर सादर केली जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक एपिसोडशी संबंधित विशेष लेख ‘तरुण भारत’च्या दैनिकात प्रसिद्ध होईल. शेवटी एकच गोष्ट म्हणावीशी वाटते. “चव्हाट गल्लीसारखी खट्टे दुसरी गल्लीच नाही!” माझी गल्ली माझा अभिमान!
टीप- पुढील भागांमध्ये बेळगावातील इतर ऐतिहासिक गल्ल्यांची माहिती व कथा आपणास “माझं वेणुग्राम” मालिकेतून मिळत राहील. पुढील भागासाठी लक्ष ठेवा- ‘तरुण भारत’ युट्यूब चॅनेल आणि दैनिक आवृत्तीवर!









