पुलाची शिरोली / वार्ताहर
कासारवाडी ता. हातकणंगले येथे सावत्र आई कडून पाच वर्षाच्या चिमूरडीवर गरम उलाथण्याने चटके देऊन अत्याचार करण्यात आला.याबाबत शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिरोली पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुभम मोकिंदराव मगरे सध्या रा.कासारवाडी, ता.हातकणंगले (मुळगांव शहापूर धांडेगाव ता अंबड जि जालना) हे दुसरी पत्नी पुजा व दोन मुलांसह कासारवाडी येथे भाडेकरू म्हणून वास्तव्यास आहेत. शुभम व पुजा यांचे दुसरे लग्न असुन दोघांनाही पहिल्या लग्नापासून अपत्य आहेत. शुभम हे शुक्रवारी कामानिमित्त बाहेर गेले असता पत्नी पुजा मगरे हिने मुलगी राणी हिला अंथरुणावरती लघवी केल्याच्या कारणातून उलाथणे तापवुन चटके देऊन भाजले.यामुळे चिमूरडीच्या गालावर, ओठांवर, तोंडावर , गळ्याजवळ व लघवीच्या वरच्या बाजूला उलाथणेने चटके देवून जखमी केले आहे. शुभम मगरे यांनी शिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.








