पुणे / प्रतिनिधी :
अल्पवयीन मुलीने बोलणे थांबविल्याचा राग मनात धरून 23 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी 16 वर्षीय मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आजीम आयुब मुलानी (वय 23, रा. वडकी, सासवड रस्ता, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना 22 जुलै रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी आणि आरोपी आजीम हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मात्र मुलीच्या घरच्यांकडून तिला तू आजीम याच्याशी बोलू नको, असे सांगण्यात आले. त्यानंतर पीडित मुलीने बोलणे थांबविले. याचा राग मनात धरून आजीम वेगवेगळय़ा मोबाईलवरून तरुणीच्या आईला आणि भावाला मिस कॉल देऊन त्रास देत असे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी ही मावस भाऊ राज पोतदार सोबत जात होती. त्यावेळी आजीम हा एका कारमधून आला आणि त्याने राजला शिव्या देत पीडित मुलीला बळजबरीने कारमधून हडपसरमधील अमनोरा मॉल या ठिकाणी नेले तसेच जिवे मारण्याच्या उद्देशाने हाताने जोरात तरुणीचा गळा दाबला. त्यावेळी मुलीने स्वतःचा जीव वाचविण्यासाठी जोरात आरडाओरोड करून स्वतःचा जीव वाचवला. या घटनेची माहिती मिळताच, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलीकडे विचारपूस केली. तसेच आरोपीचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी दिली.









