दिल्लीत युवतीच्या मृत्यूचे प्रकरण ः घटनेवेळी पीडितेसोबत होती तिची मैत्रिण
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीच्या कंझावला येथील कथित हिट अँड रन प्रकरणात युवतीचे डोके तसेच शरीराच्या खालच्या भागात गंभीर इजा झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. शवविच्छेदन अहवालात युवतीवर बलात्कार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तर संबंधित घटनेवेळी युवतीसोबत प्रवास करत असलेल्या तिच्या मैत्रिणीने दुर्घटनेसाठी कारचालक जबाबदार असल्याचा जबाब पोलिसांना दिला आहे. तर मृत युवतीवर मंगळवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
कारने स्कुटीला धडक दिल्यावर मी घाबरले होते, याचमुळे कुणाला काहीच सांगू शकले नव्हते. कारने धडक दिल्यावर माझी मैत्रिण एका बाजूला अन् मी दुसऱया बाजूला कोसळले होते. या दुर्घटनेमुळे घाबरल्याने तेथून थेट घरी पोहोचल्याचे या साक्षीदार युवतीने सांगितले आहे. तर आरोपींनी स्कुटी वेगात असल्यानेच दुर्घटना झाल्याचा दावा चौकशीदरम्यान केला आहे.
शवविच्छेदनात युवतीचे डोके, पाठ अन् शरीराखालील भागात गंभीर इजा झाल्याने आणि मोठय़ा प्रमाणात रक्तस्राव झाल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. शवविच्छेदनात बलात्काराची पुष्टी झालेली नसल्याचे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त एस. पी. हुड्डा यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले आहे. याप्रकरणातील 5 आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
तत्पूर्वी पोलिसांनी स्कुटीवरून पीडितेसोबत तिची मैत्रीणही प्रवास करत होती असा खुलासा केला. दुर्घटनेनंतर मृत युवती कारच्या चाकात अडकून पडली आणि ती 12 किलोमीटरपर्यंत फरफटत गेली होती. स्कुटीवरून प्रवास करणाऱया दुसऱया युवतीने दुर्घटनेनंतर तेथून पळ काढला होता. ही युवती किरकोळ जखमी झाली आहे.
तर दुसरीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मृत युवतीच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपयांची मदत करण्याची आणि खटला लढण्यासाठी सर्वात चांगला वकील नियुक्त करण्याची घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाच्या 12 आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेत निष्काळजीपणा दर्शविणाऱया पोलीस कर्मचाऱयांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सीसीटीव्ही फुटेजद्वारे खुलासा
दिल्लीच्या रोहिणी भागातील एका हॉटेलसमोरील सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांनी मिळविले आहे. या फुटेजमध्ये पीडित युवती स्वतःच्या मैत्रिणीसोबत स्कुटीवरून जात असताना दिसून आली होती. पोलीस आता हॉटेलमधील कर्मचाऱयांकडून माहिती मिळवत पुढील तपास करत आहेत. विशेष पोलीस आयुक्त शालिनी सिंह यांनी सोमवारी रात्री उशिरा घटनास्थळी जात अधिक माहिती मिळविली आहे. तसेच त्यांनी स्वतःचा अहवाल तयार करत तो गृह मंत्रालयाला सोपविल्याचे समजते.









