पुन्हा चालणे-बोलणे शिकतेय
मानवी शरीर इतके अनोखे आहे की याविषयी माणूसच पूर्णपणे जाणू शकलेला नाही. अनेकदा माणसाला असे आजार होतात, ज्याविषयी फारशी माहितीच नसते. असाच एक आजार अमेरिकेतील एका युवतीला झाला आहे. या युवतीला आता या आजारामुळे चालणे-बोलणे पुन्हा शिकावे लागत आहे. कारण या विचित्र आजारामुळे ती सर्वकाही सिरत होती. तिच्या मेंदूला ऊर्जा देण्यासाठी तिच्या शरीरावर बॅटरी लावण्यात आली होती. फ्लोरिडा येथे राहणारी समांथा स्टॅब आता वयाच्या 24 व्या वर्षी पुन्हा चालणे आणि बोलणे शिकत आहे. ती एका दुर्लभ न्यूरोलॉजिकल मूव्हमेंट डिसऑर्डर जनरलाइज्ड डीवायटी1 डिस्टोनियाने पीडित आहे. या आजारात शरीराचे स्नायू अनियंत्रित स्वरुपात वळू लागतात, ज्यामुळे चालणे, बोलणे आणि सामान्य हालचाली करणे अवघड ठरते. समांथा 7 वर्षांची असताना तिच्या या आजाराचे निदान झाले होते. हा एक आनुवांशिक आजार असून तो सर्वसाधारणपणे एक अवयवातून सुरू होतो आणि मग हळूहळू शरीराच्या उर्वरित हिस्स्यांमध्ये फैलावतो. यात कंपन, वेदना, संतुलनाची कमतरता आणि समन्वयात समस्या होते.
हळूहळू बंद पडू लागले शरीर
माझ्याप्रकरणी हे प्रथम डाव्या पायाने सुरू झाले आणि एका आठवड्यात मी चालण्यास असमर्थ ठरले. मला व्हीलचेअरची मदत घ्यावी लागली, त्यानंतर माझे हातही प्रभावित झाले असे समांथा सांगते. समांथा 9 वर्षांची असताना तिच्यावर डीप ब्रेन स्टिम्युलेशन नावाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यात तिच्या मेंदूत इलेक्ट्रोड लावण्यात आले, जे एका बॅटरीशी जोडलेले होते. ही बॅटरी तिच्या पोटात बसविण्यात आली होती आणि इलेक्ट्रिक सिग्नलद्वारे स्नायू आणि बोलण्याच्या क्षमतेला नियंत्रित केले जात होते. समांथाची चालण्याची पद्धत असामान्य आहे, ती लंगडत चालते आणि तिचा पेल्विक बोन खालच्या बाजूला झुकतो, यामुळे ती नशेत असल्याचे लोकांना वाटते.
डॉक्टरांकडून पुन्हा शस्त्रक्रिया
अलिकडेच डॉक्टरांनी तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया केली असून यात मेंदूतील जुन्या वायसं आणि बॅटरी बदलून त्यांना नव्या ठिकाणी लावण्यात आले आहे, जेणेकरून आजाराला अधिक प्रभावीपणे टार्गेट करता येईल. शस्त्रक्रियेनंतर ती पुन्हा व्हिलचेअरवर परतली. ती काही काळापर्यंत चालू शकत नव्हती, बोलू शकत नव्हती. शस्त्रक्रियेनंतर माझा डावा पाय आणि मनगट कापत राहायचे. झोपही प्रभावित व्हायची, परंतु हे तात्पुरते असल्याचे मी जाणून होते. मी आशा सोडली नाही असे ती सांगते. सातत्याने फिजिकल थेरपी अणि जिममध्ये सरावामुळे समांथा पुन्हा चालू लागली आहे. मी आता पूर्वीपेक्षा चांगल्याप्रकारे चालू शकते, माझ्या शरीराचा वरील हिस्सा आणि पाय आता मजबूत होत आहेत. हे सर्व मेंदूला पुन्हा चालणे शिकविण्यासारखे असल्याचे ती सांगते. समांथा अद्याप आठवड्यात तीनवेळा थेरपी घेते आणि दर महिन्याला स्वत:च्या सेटिंग्सना डॉक्टरांकडून रीप्रोग्राम करविते. ती दररोज जिमला जाते आणि हॉट पिलाट्से किंवा रिफॉर्मर क्लासेसमध्ये भाग घेते. हा आजार पूर्णपणे बरा होणार नाही हे तिला माहित आहे.









