आल्त दाबोळीतील केशव स्मृतीच्या साक्षी लमाणीची कौतुकास्पद कामगीरी
प्रतिनिधी /वास्को
कोणतीही शैक्षणिक पाश्वभूमी नसलेल्या आणि व्यवसायाने वाहन चालक असलेल्या वडिलांच्या मुलीने गोवा शालांत मंडळाच्या दहावीच्या परिक्षेत 93.50 टक्के गुण प्राप्त केले आहेत. साक्षी मारूती लमाणी असे नाव असलेल्या आणि झुआरीनगरात राहणाऱया या मुलीला भविष्यात डॉक्टर व्हायचे आहे. समाजाची सेवा आणि आई वडिलांच्या आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत.
मारूती लमाणी आणि त्याचे कुटुंब झुआरीनगरात राहते. मारूतीला तीन मुली आणि एक मुलगा. मारूती हा अर्ध्यावर शाळा सोडलेला आणि कुरीयरच्या गाडीचा चालक म्हणून कष्ट करणारा. त्याची पत्नी घर सांभाळणारी. मारूती एकटाच कमावणारा आणि सहा जणांच्या कुटुंबाचा कष्टाने गाडा ओढणारा कुटुंब प्रमुख. गरीब परिस्थितीमुळे मारूतीला शाळा अर्ध्यावर सोडावी लागली होती. तेव्हापासून मारूती कष्टच करीत आहे. मात्र, आपली मुले चांगली शिकावी आणि त्यांनी नाव कमवावे अशी त्यांची तीव्र ईच्छा. आम्ही शिकू शकलो नाही. परंतु आमची मुले शिकावीत या भावनेने मारूती आणि त्यांची पत्नी धडपडतात. या पालकांची ही ईच्छा त्यांची मुले पूर्ण करण्याच्या वळणावर आहेत. साक्षी ही त्यांची मोठी मुलगी. आल्त दाबोळीच्या केशव स्मृती हायस्कुलची ती हुशार विद्यार्थीनी. तीची बहिणही याच शाळेतील नववीची विद्यार्थीनी असून तीसुध्दा अभ्यासात साक्षी सारखीच हुशार आहे. कु. साक्षीने यंदाच्या दहावीच्या परिक्षेत 93. 50 टक्के गुण प्राप्त केले. वाहन चालक म्हणून सेवा बजावणारे वडिल आणि कुटुंबाला नसलेली शिक्षणाची पाश्वभूमी. अशा परिस्थितीतही तीने यशाला गवसणी घातल्याने ती कौतुकास पात्र ठरलेली आहे. आपल्या यशाचे श्रेय ती आपले शिक्षक व आई वडिलांना देते. तीला भविष्यात डॉक्टर बनून समाजाची सेवा आणि आई वडिलांच्या ईच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत. तीला नृत्य कला, चित्रकला तसेच स्वयंपाक बनवणेही आवडते. माझे आई वडिल आमच्यासाठी खूप कष्ट घेत आहेत. गरीब परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही याची त्यांना खंत आहे. आपली स्वप्ने मुलांनी पूर्ण करावीत म्हणून ती धडपडत आहेत. त्यांची ईच्छा आम्ही पूर्ण करू असा विश्वास साक्षी व्यक्त करते.
घरात सर्व सुखसोयी आणि कुटुंबाला दर्जेदार आणि उच्च शिक्षणाची पाश्वभूमी असूनही बरीच मुले शैक्षणिक प्रगतीत मागे पडताना दिसून येतात. अशा परिस्थितीत मारूती लमाणीची मुले नक्कीच कौतुकास पात्र ठरतात आणि इतर विद्यार्थ्यांसाठी आदर्शही ठरतात.









