दुष्यंतपुत्र भरत राजाचा वंशज राजा रंतिदेव याची गणना सर्वोत्तम योग्यांमध्ये केली जाते. श्रीमद भागवतमध्ये वर्णन येते की रंतिदेवने कोणत्याही वस्तूला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला नाही. दैवयोगाने जे काही प्राप्त झाले, ते स्वीकारण्यात त्यांनी समाधान मानले. अशा दिव्य भावनेत रहात असताना घरी कधी अतिथी येताच तो त्यांना सर्व काही अर्पण करीत असे. त्यामुळे त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांना कष्ट सोसावे लागले. कधी कधी तर अशी वेळ यायची की, त्याला आणि त्याच्या परिवारातील सदस्यांना खाण्यास अन्न मिळत नसे म्हणून ते भुकेने व्याकुळ होऊन थरथर कापायचे, परंतु कोणत्याही प्रसंगी रंतिदेव आपला धीर खचू देत नसे. एकदा 48 दिवस उपवास केल्यावर दूध आणि तुपात शिजविलेले कांही पदार्थ आणि प्यायला पाणी असे त्याच्यासमोर वाढण्यात आले, पण तो आणि त्यांचे कुटुंब जेवणार तोच एक ब्राह्मण अतिथी तेथे उपस्थित झाला.
रंतिदेव सर्वत्र आणि सर्व जीवांमध्ये पूर्ण पुऊषोत्तम भगवंतांचे वास्तव्य पहात असल्यामुळे त्याने त्या ब्राह्मणाचा आदर करून श्र्रद्धेने आपल्या अन्नाचा भाग त्याला अर्पण केला. ब्राह्मण ते अन्न भक्षण करून तेथून निघून गेला.
तो निघून गेल्यावर कुटुंबाचा भाग वेगळा काढून रंतिदेव उरलेला अन्नभाग स्वत: खाणार तेवढ्यात एक शूद्र अतिथी तेथे आला. तो अतिथी म्हणजे पूर्ण पुऊषोत्तम भगवान श्री हरीचा अंश असल्याचे पाहून रंतिदेवने आपला अन्नाचा भाग प्रेमपूर्वक त्या शूद्राला दिला.
शूद्र निघून गेल्यावर काही कुत्रे सोबत घेऊन आणखी एक अतिथी तेथे आला नि काकुळतीने म्हणाला ‘हे राजा, मी आणि माझे कुत्रे फार भुकेले आहोत. कृपया आम्हाला अन्न दे.’ रंतिदेवने त्याचाही आदर करून उरलेले अन्न सन्मानपूर्वक त्याला अर्पण केले आणि त्याला आणि त्याच्या कुत्र्यांना नमस्कार केला.
आता त्याच्याजवळ केवळ पाणीच तेवढे शिल्लक उरले होते आणि तेसुद्धा एकट्याला पुरेल एवढेच होते. ते पाणी रंतिदेव पिणार इतक्मयात एक चांडाळ तेथे येऊन म्हणाला “हे राजा, मी चांडाळ असलो तरी मला पिण्यासाठी पाणी दे” त्या दीन, थकल्या भागल्या चांडाळाचे करूण वचन ऐकून रंतिदेवला अपार दु:ख झाले आणि म्हणून तो मधुर शब्दांनी त्याच्याशी बोलू लागला. (भा 9.21.12) न कामयेऽहं गतिमीश्वरात् परा-मष्टर्द्धियुक्तामपुनर्भवं वा । आर्तिं प्रपद्येऽखिलदेहभाजा-मन्त:स्थितो येन भवन्त्यदु:खा: ।। अर्थात “मी पूर्ण पुऊषोत्तम भगवंताकडे अष्टसिद्धीची अथवा मोक्षाचीही कामना करीत नाही. मला केवळ सर्व प्राणिमात्रांसमवेत राहून त्यांच्यावतीने सर्व प्रकारचे क्लेश भोगण्याची इच्छा आहे, जेणेकरून ते दु:खमुक्त व्हावेत.”
जगण्यासाठी संघर्ष करीत असलेल्या या दीन चांडाळाचे प्राण वाचविण्याकरिता माझे पाणी त्याला दान केल्यामुळे मी स्वत: तहान, भूक, श्र्रम, कंप, दैन्य, क्लेश, शोक आणि मोह या सर्वांपासून मुक्त झालो आहे. असे म्हणून, तहानेने ज्याचा जीव जायची वेळ आली होती, त्या रंतिदेवने नि:संकोचपणे आपले पाणी त्या चांडाळाला अर्पण केले, इतका तो राजा स्वभावाने दयाळू आणि धीट होता.
यास्तव वैष्णवांना ‘परदु:ख दु:खी’ अर्थात इतरांचे दु:ख पाहून दु:खी होणारा, म्हणून गौरविले जाते. यास्तव वैष्णव भक्तच मानव समाजाचे वास्तविक कल्याण करणाऱ्या कार्यात भगवंताचा सेवक म्हणून गुंतलेला असतो. रंतिदेव सर्व जीव म्हणजे पूर्ण पुऊषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांचे अंश आहेत यादृष्टीने पाहत असे, या कारणास्तव त्याने शारीरिक अथवा सामाजिक स्तरावर ब्राह्मण, शूद्र, धनवान, दरिद्री, चांडाळ असा भेदभाव कधीही केला नाही. अशी समदर्शी दृष्टी असलेल्या व्यक्तीला भगवद्गीतेमध्ये ‘पंडित’ म्हटले आहे. (भ गी 5.18) विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि । शनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन:।। अर्थात “विनम्र साधुव्यक्ती यथार्थ ज्ञानाच्या आधारे विद्याविनयसंपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा आणि चांडाळ या सर्वाना समदृष्टीने पाहते”. वैष्णव हा कोणत्याही जाती किंवा शरीर यामध्ये कोणताच भेदभाव करीत नाही. सामाजिकदृष्ट्या ब्राह्मण चांडाळ इत्यादी हे भिन्न असतील किंवा शरीराचा विचार करता कुत्रा, हत्ती, गाय हे भिन्न असतील, परंतु विद्वान पंडितांच्या दृष्टीने हे भेद निरर्थक आहेत. कारण ते सर्व भगवंतांशी संबंधित आहेत आणि भगवंत, परमात्मा या आपल्या विस्तारित रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित आहे.
या समदर्शी भावनेने रंतिदेवने सर्वांची सेवा केली. त्यानंतर ब्रह्म-शिवांसारखे देव भौतिक इच्छा करणाऱ्यांना भोग देत असतात आणि साक्षात ते देवच रंतिदेवची समदर्शी भावना पाहून त्याच्या समोर प्रकट झाले. या देवतांनीच ब्राह्मण, शूद्र आणि चांडाळाच्या वेशात येऊन त्यांची परीक्षा घेतली होती. रंतिदेव राजाला या देवतांकडून भौतिक वरदानांची कोणतीही अपेक्षा मुळीच नव्हती, त्याने सर्व उपस्थित देवतांना नम्र प्रणाम केला परंतु तो भगवान वासुदेवांवर आसक्त असल्यामुळे त्याने आपले मन त्यांच्याच चरणावर एकाग्र केले. रंतिदेव भगवान श्रीकृष्णाचा शुद्ध भक्त आणि सर्व भौतिक भावनांपासून मुक्त असल्यामुळे भगवंतांची मायाशक्ती स्वत:ला त्याच्यासमोर प्रकट करू शकली नाही, याउलट एक स्वप्न लुप्त व्हावे तशी त्याच्याकरिता माया नष्ट झाली. अशा प्रकारे राजा रंतिदेव यांच्या तत्त्वाचे पालन करणारे त्यांचे अनुयायी त्याची संपूर्ण कृपा प्राप्त झाल्यामुळे विशुद्ध भक्त होऊन पूर्ण पुऊषोत्तम भगवान नारायणांवर आसक्त झाले. अशा प्रकारे त्यांची गणना सर्वोत्तम योग्यांमध्ये करण्यात आली.
रंतिदेव सर्वोत्तम योगी कसे हा प्रŽ आपल्याला पडू शकतो. यासाठी सर्वोत्तम योग्याची व्याख्या करताना भगवान श्रीकृष्ण म्हणतात (भ गी 6.47) योगिनामपि सर्वेषां मद्ग तेनान्तरात्मना। श्र्रद्धावान्भजते यो मां स मे युक्ततमो मत: ।।अर्थात “सर्व योग्यांमध्ये जो दृढ श्र्रद्धेने सदैव माझ्यामध्ये वास करतो, अंत:करणात माझे चिंतन करतो आणि माझी प्रेममयी सेवा करतो तो माझ्याशी पूर्णपणे योगयुक्त असतो, तोच सर्वश्रेष्ठ योगी होय, असे माझे मत आहे.” सदैव हृदयांतरी पूर्ण पुऊषोत्तम भगवंताचे चिंतन करणारा योगी सर्वोत्तम होय. रंतिदेव राजा शासनप्रमुख होता आणि त्याच्या दिव्य संगतीच्या प्रभावामुळे त्याची सर्व प्रजा पूर्ण पुऊषोत्तम भगवान नारायणांची भक्त झाली. हा शुद्ध भक्ताचा प्रभाव होय, आपल्यासारखेच समदर्शी ते सर्वाना बनवू शकतात.
भगवान श्रीकृष्णही सर्वाना आपले शरीर दुसऱ्यांच्या कल्याणाकरिता कसे उपयोगात आणावे याबद्दल मार्गदर्शन करताना म्हणतात (भा 10.22.35) एतावज्जन्मसाफल्यं देहिनामिह देहिषु । प्राणैरर्थैर्धिया वाचा श्रेयआचरणं सदा ।। अर्थात “प्रत्येक मनुष्याने आपले प्राण, धन, बुद्धी आणि वाणीने प्राणिमात्रांच्या कल्याणाकरिता सदैव कार्य करीत राहणे, हेच प्रत्येक जीवांचे कर्तव्य आहे.”
संत तुकारामही अशाच आशयाच्या एका अभंगात म्हणतात जें का रंजलें गांजलें । त्यासि म्हणे जो आपुलें ।।1।।तोचि साधु ओळखावा । देव तेथेंचि जाणावा ।।ध्रु।।मृदु सबाह्य नवनीत । तैसें सज्जनाचें चित्त ।।2।।ज्यासि आपंगिता नाहीं । त्यासि धरी जो हृदयीं ।।3।।दया करणें जें पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।।4।।तुका म्हणे सांगू किती। तोचि भगवंताची मूर्ती ।।5।।अर्थात “जीव सुखाने रंगलेले असोत अथवा दु:खाने गांजलेले असोत, त्या सर्वाना कोणताही भेदभाव न करता हे सर्व आपले आहेत, असे जो मानतो, तोच खरा साधू असल्याचे समजावे आणि त्याच्याच जवळ भगवान श्रीकृष्ण आहेत हे जाणावे. लोणी जसे अंतर्बाह्य मऊ असते, त्याप्रमाणे सज्जनांचे चित्त असते. ज्याला कोणी आश्र्रय देत नाही अशा अनाथांनाही तो साधू आपल्या हृदयात स्थान देतो. जे प्रेम आपल्या पुत्रावर करतो तसेच प्रेम तो आपल्या सेवकांवरही करतो. तुकाराम महाराज म्हणतात, अशा साधूंविषयी काय सांगू ? तो तर साक्षात भगवंताची मूर्ती आहे.
साधू हा स्वत:च्या अपूर्ण दृष्टीने जगाकडे पाहत नाही तर परिपूर्ण भगवान श्रीकृष्णाच्या नजरेतून पाहतो. त्यामुळे त्याच्या हृदयात कोणत्याही प्रकारचे मतभेद नसतात. म्हणूनच अशी समदर्शी व्यक्तीच सर्व जीवांच्या हितासाठी कार्य करते.
-वृंदावनदास








