मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रतिपादन
बेळगाव : मंगळवारी बेळगाव येथे होणारा ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ मेळावा ऐतिहासिक मेळावा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी दिली. या मेळाव्यात सुमारे दोन लाखाहून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, 1924 मध्ये महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन झाले होते. या अधिवेशनाच्या शतकमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. कर्नाटकाचे प्रभारी रणदीपसिंग सूरजेवाला, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आदींनी गेल्या चार दिवसांपासून बेळगावात तळ ठोकून सर्व तयारी पूर्ण केली आहे. महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जनमानसात जागृती झाली पाहिजे. त्यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. संविधानाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. याची जाणीव प्रत्येकांना झाली पाहिजे. संविधानाचे रक्षण केले तरच संविधान आमचे रक्षण करणार आहे. शतकमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणारा मेळावा ऐतिहासिक ठरणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
त्यांना इतिहास माहीत नाही
महात्मा गांधीजींच्या हत्या प्रकरणात पं. जवाहरलाल नेहरू यांचा हात होता, असा खळबळजनक आरोप भाजप नेते बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना सिद्धरामय्या म्हणाले, त्यांना इतिहास माहीत नाही. त्यांनी तो वाचला नाही. त्यामुळेच ज्यांना इतिहास माहीत नाही, ते इतिहास निर्माण करू शकणार नाहीत, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले आहे. महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसे यांनी केली. स्वातंत्र्यवीर सावरकरही सहभागी होते, असा खटला चालला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.









