गोवा सीआयडीचा माजोर्डा येथे छापा : पाच राज्यांतील नऊजण गजाआड,रोकड, मोबाईल्स, हेडफोन्स, मॉडेम जप्त
पणजी : आपण अमेरिकेतील बँक अधिकारी असल्याचे भासवून गोव्यातील माजोर्डा येथून अमेरिकेतील लोकांना ‘ऑन लाईन’द्वारे कोट्यावधींच्या रुपयांना गंडविणाऱ्या भारतीय आंतरराज्य टोळीचा गोव्याच्या गुन्हा अन्वेषण विभगाच्या पोलिसांनी काल बुधवारी माजोर्डा येथे छापा टाकून रॅकेटचा पर्दाफाश केला. नऊजणांना गजाआड केले असून त्यांच्याकडून अत्त्याधुनिक साहित्यही जप्त केले आहे. देशातील विविध पाच राज्यांतील चोरट्यांचा सहभाग असलेल्या या आंतरराज्य टोळीने गोव्यातील माजोर्डा येथे बनावट कॉल सेंटर सुरु करुन त्याद्वारे हे रॅकेट सुरु होते. महाराष्ट्र, गुजरात, मेघालय, नागालँड, बंगाल या राज्यांतील हे चोरटे आहेत.
अमेरिकेतील माहितीनुसार छापा
हे लोक अमेरिकेतील लोकांच्या खात्यातील पैसे उकळत होते. आपल्या खात्यातून रक्कम गायब होत असल्याच्या अनेक तक्रारी अमेरिकेतील नागरिकांनी केल्यानंतर अमेरिकेतील तपास यंत्रणेच्या रडारवर माजोर्डा येथील हे कॉल सेंटर आले होते. त्यानंतर तेथील तपास यंत्रणेने भारतीय प्रशासनाला या प्रकाराची कल्पना दिल्यानंतर गोवा पोलिसांना निर्देश देण्यात आले. तपासाअंती या टोळीचे हे केंद्र दक्षिण गोव्यातील माजोर्डा येथे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काल बुधवारी सायंकाळी माजोर्डा परिसरातील ‘आर्वन हॉलिडे होम्स’ येथे छापा टाकण्यात आला.
पाच राज्यांतील चोरट्यांचा सहभाग
या छाप्यात भारतातील पाच राज्यातील 9 आरोपेना गजाआड करण्यात आले. मुंबईतील 27 वर्षीय रेहान शेख, अहमदाबाद -गुजरात येथील 33 वर्षीय विनय मकवाना, गुजरातमधील 28 वर्षीय घाची अल्फर्झ, शिलाँग- मेघालय येथील 23 वर्षीय आकाश बिस्वा, मेघालयातील 23 वर्षीय आकाश सुनार, पश्चिम बंगालातील 22 वर्षीय केसंग तमांग, मुंबईतील 29 वर्षीय राहुल सरसार, मेघालयातील 25 वर्षीय अजय बिस्वा, नागालँडमधील 20 वर्षीय तन्मय दासगुप्ता अशी गजाआड रण्यात आलेल्यांची नावे आहेत.
खास अॅप तयार करुन लुटले अमेरिकनांना
माजोर्डा येथील छाप्यात नऊजणांना गजाआड करण्याबरोबरच गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी रोख 65 हजार, अत्याधुनिक मोबाईल्स, हेडफोन्स, मॉडेम मिळून सुमारे 15 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. या टोळीने खास अॅप विकसीत केले होते. अॅपच्या माध्यमातून त्यांनी अमेरिकेतील नागरिकांची आर्थिक माहिती, बँक माहिती मिळवली. नंतर तेथील लोकांना आपण बँक अधिकारी असल्याचे भासवून त्यांना ऑन लाईन व्यवहाराद्वारे गंडवण्यास प्रारंभ केला होता.









