सावंतवाडी प्रतिनिधी
महाराष्ट्र सरकार नवे शैक्षणिक धोरण राबवण्याच्या विचारात असताना यंदापासून नवे शैक्षणिक धोरण टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले होते. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये बदल करण्यात आला आहे. चार टप्प्यात पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली असून पहिल्या चाचणीसाठी सर्व विषयांचे एकच पुस्तक त्यामध्ये नोट वही अशी नवी रचना करण्यात आली आहे. नवे पाठ्यपुस्तक व नोंदवही असे नवे स्वरूप विद्यार्थी शिक्षकांच्या अंगवळणी पडताना दिसत नाही. पुस्तकाच्या रचनेमध्ये एक धडा आणि एक नोंद वही, कोरे पान असे स्वरूप आहे. एकाच पुस्तकात सर्व विषय असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. वर्षभरात प्रत्येक घटक चाचणी नुसार एक पुस्तक सर्व विषयांचे असणारआहे. शासनाने चारही टप्प्यातील पुस्तकांची निर्मिती केली असून त्यांचे वितरण शाळांमध्ये करण्यात आले आहे. मात्र, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये या पुस्तकांचे वितरण झालेलेच नाही. शाळा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी पुस्तक व ड्रेस मोफत वाटपची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची हवेतच विरल्यागत आहे. अद्यापही ड्रेसचा पत्ता नाही अशी स्थिती आहे. तसेच प्राथमिक शाळांमध्ये शून्य शिक्षकी शाळा असे एकंदरच या नव्या शैक्षणिक वर्षापासून शिक्षण विभागाचे तीन तेरा वाजले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाची अवस्था अत्यंत बिकट असून कोणाचेच कोणावर अंकुश नाही अशी स्थिती आहे. या जिल्ह्याचे आमदार या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत. पण, या जिल्ह्याच्या शिक्षण विभागाचा कारभार पाहिला तर कुणालाच कुणाचे सोयरसुतक दिसत नाही. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात शून्य शिक्षकी शाळा शेकडोंच्यावर आहेत. आणि शाळा सुरू होऊन पंधरा दिवस झाले तरी शाळांमध्ये शिक्षक नाहीत अशी अवस्था आहे. प्राथमिक स्तरावरील मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये नव्या पाठ्यपुस्तकांची वितरण झाले असले तरी काही सेमी व इंग्रजी माध्यमांच्या अनुदानित शाळांमध्ये अद्यापही पाठ्यपुस्तकांचे वितरण झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थी पाठ्यपुस्तके कधी मिळणार याची विचारणा करत आहेत.









