आज इंगळ्यांचा तर उद्या श्री महालक्ष्मी देवीला ओटी भरण्याचा कार्यक्रम : भाविकांची गर्दी
बेळगाव : सालाबादप्रमाणे पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वाद्ये लावून बैलजोड्या जुंपून गुलालाची उधळण करत रविवारी सायंकाळी गाडेयात्रेला प्रारंभ झाला. यावर्षी डॉल्बीरहित यात्रोत्सव उत्साहात पार पाडणार असल्याचे प्रमुख पंच शिवाजी पट्टण यांनी सांगितले. सोमवार दि. 10 रोजी श्री ब्रह्मलिंग देवस्थानसमोर सायंकाळी 6.30 वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम होणार आहे. तसेच मंगळवार दि. 11 रोजी ग्रामदेवी श्री महालक्ष्मी देवीच्या वाढदिवसानिमित्त ओटी भरण्याचा कार्यक्रम परिसरातील महिला करणार आहेत. येथील मानाचा गाडा मारुती गल्ली व गणपत गल्ली येथील मिळून मिरवणूक निघते. सदर गाड्याचे पूजन नेमिनाथ अरळपण्णावर यांनी केले. तर मंदिरातील हनुमान मूर्तीचे पूजन दीपक सातगौडा यांनी केले. यावेळी सुरेश मासेकर व शिवाजी पट्टण यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. मजगावात प्रत्येक गल्लीत एक बैलगाडा जुंपण्यात येतो. त्या बैलगाड्यासमोर सजावट करून बैलजोड्या जुंपल्या जातात व त्या बैलजोड्यासमोर पारंपरिक करडीमदल (वाद्य) लावून त्याच्या ठेक्यात गुलालाची उधळण करीत मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालते. या दिवशी करमणुकीचे कार्यक्रमांचेही आयोजन केलेले आहे. रविवारी रात्री 8 वाजता सर्व गाडे श्री ब्रह्मलिंग देवस्थानकडे आल्याबरोबर शेतकरी, कामगार वर्गाने गाऱ्हाणे घालून मागणी केली. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी इंगळ्यांसाठी झाडांच्या ओल्या फांद्या आणतात. यानंतर दुपारी फक्त बैलजोड्या जुंपून गुलालाची उधळण करीत इंगळ्यांच्या ठिकाणी विधिवत पूजन करून गाऱ्हाणे घालून इंगळ्या पेटविल्या जातात. त्यानंतर गावभर बैलजोड्यांची मिरवणूक निघते. अशा पद्धतीने मजगाव संपूर्ण गुलालमय होते. सायंकाळी 6.30 वाजता इंगळ्यांचा कार्यक्रम अत्यंत भावनिक आणि समाधानाने हजारो भक्त संपूर्ण दिवसभर उपवास करून इंगळ्यांच्या कार्यक्रमात भाग घेतात.
परिसरातील भाविकांची गर्दी
यावेळी मजगाव, उद्यमबाग, ब्रह्मनगर, कलमेश्वरनगर, राजारामनगर, गजानननगर, संत ज्ञानेश्वरनगर, महावीरनगर, पिरनवाडी, खादरवाडी, अनगोळ व इतर गावातील भाविक इंगळ्या कार्यक्रमासाठी आवर्जुन उपस्थित राहतात. इंगळ्या कार्यक्रमानंतर प्रत्येक गल्लीतील वाजंत्रीचे जुगलबंदी कार्यक्रम होतो. त्यानंतर पुन्हा गल्लोगल्ली गुलालाची उधळण करत वाद्ये वाजत ‘मदल’ कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत होतो. अशी ही मजगावची पारंपरिक गाडेयात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मंदिर परिसरात खेळण्यांची व खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लावले आहेत. यासाठी ग्रामस्थ, पंचकमिटी, नगरसेवक तसेच उद्यमबाग पोलिसांचे सहकार्य लाभत आहे.









